लहान मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या वाढतायत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जी मुले रोज गोड खातात त्यापैकी 81 टक्के मुलांमध्ये मोठय़ा मौखिक समस्या असून 67 टक्के मुलांमध्ये कीड आहे किंवा ती होण्याचा धोका आहे. देशातील दहापैकी 8 मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत व त्यावर लगेच इलाज करणे गरजेचे आहे, अशी धक्कादायक बाब कांटर आयएमआरबीच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लहान मुलांमध्ये आढणाऱ्या काही समस्यांमध्ये प्लाक जमा होणे, दातांवरील पांढरे डाग, दिसून येणारी कीड, हिरडय़ांना सूज, श्वासांना दुर्गंधी येणे आणि हिरड्यांतून रक्त येणे इत्यादींचा समावेश आहे.

कांटर आरएमआरबीकडून कोलगेट पामॉलिव्ह इंडियासाठी राष्ट्रीय पातळीवर हे सर्वेक्षण केले होते. यासाठी 20/30 मोठय़ा व्यक्ती आणि 10/80 लहान मुलांच्या मौखिक आरोग्याचा अभ्यास केला होता. सर्वेक्षणात असे आढळून आले की, 3 पैकी 2 मुलांमध्ये कीड असून ती कीड वाढण्याचा धोका आहे. अभ्यासातून हेही दिसून आले की, 10 पैकी 8 मोठय़ा लोकांमध्येसुद्धा मोठय़ा प्रमाणावर मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत. मौखिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या शहरांमध्ये मुंबई आघाडीवर असून 90 टक्के लोक मौखिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्याखालोखाल कोलकाता (93 टक्के), हैदराबाद (82 टक्के), दिल्ली (79 टक्के), चेन्नई (68 टक्के) आणि बंगळुरू (46 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.

सर्वेक्षणातून आणखी एक मोठी बाब समोर आली आहे ती म्हणजे अधिकतर लोकांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जागरूकता नाही.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 60 टक्क्यांहून अधिक मुलांनी मागील एक वर्षाच्या कालावधीत डेंटिस्टला भेट दिलेली नाही. त्याचबरोबर सर्वेक्षणातून हे दिसून आले की, 10 पैकी 8 मुलांमध्ये दातांची समस्या ही रोज गोड खाण्याने निर्माण झालेली आहे.