ट्रेन लेट झाली म्हणून प्रवाशांना भरपाई

981
tejas-26

ट्रेन लेट होण्यात आता मुंबईकरांना काही वाटेनासे झाले आहे. पण ट्रेनच्या उशिरा येण्यावर रेल्वेच्या आयआरसीटीसीने प्रवाशांना भरपाई देण्याचा नियम केला आहे. तरीही दररोज प्रत्येक ट्रेन वीस ते पंचवीस मिनिटे उशिरानेच चालते. पण आता तेजस एक्प्रेस लेट झाली म्हणून त्यातून प्रवास करणाऱया सर्व 951 प्रवाशांना प्रत्येकी 250-250 रुपये भरपाई दिली जाणार आहे. रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी भरपाई दिली जात आहे. यासाठी रेल्वेला 2 लाख 37 हजार 750 रुपये खर्च करावे लागतील.

आयआरसीटीसीच्या नियमांतर्गत तेजस एक्प्रेस एक तास लेट झाली तर प्रवाशांना 100 रुपये, दोन तास लेट झाल्यास 250 रुपये भरपाई द्यायची असे ठरले आहे. रेल्वे प्रशासनाने आपले हे आश्वासन पाळायचे ठरवले आहे. लखनौ जंक्शनवर गुरुवारी रात्री कृषक एक्प्रेसचे दोन डबे घसरल्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळे नवी दिल्लीला प्रथमच रवाना होणाऱया तेजस एक्प्रेसलाही पावणेतीन तास लेट झाला. त्यानंतर दिल्लीहून परत येतानाही ही ट्रेन जवळपास दोन तास उशिरा आली. त्यामुळे आयआरसीटीसीने प्रवाशांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची माफी मागितली

लखनौहून दिल्लीसाठी जाण्यासाठी 451 प्रवासी तेजस एक्प्रेसमध्ये चढले. दिल्लीहून 500 प्रवाशांनी लखनौसाठी या ट्रेनने प्रवास सुरू केला. त्यामुळे एकूण 951 प्रवाशांना भरपाई देण्याचे आपले कर्तव्य आहे, असे आयआरसीटीसीच्या सीआरएम अश्विनी श्रीवास्तव यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही या प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली आहे. त्यावर क्लिक करून ते ही भरपाई प्राप्त करू शकतात. ज्या प्रवाशांनी सेंट्रल स्टेशनच्या तिकीट खिडकीवरून तिकीट घेतले आहे, त्यांनाही मेसेज पाठवून आम्ही रिफंड घेण्याबाबत सांगितले आहे. तेजस एक्प्रेस लेट झाली तेव्हा आम्ही प्रवाशांना जादा चहा, दुपारचे जेवण आणि जेवणाच्या पॅकेटवर ‘विलंब झाल्यामुळे माफी’ असे लिहिलेल्या स्टिकर्ससह सर्व व्यवस्था केली होती, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या