‘तेजस एक्सप्रेस’ काही काळ यार्डात; प्रवासी मिळत नसल्याने पंचाईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

देशाची पहिली प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ पुन्हा एकदा यार्डात रवाना झाली आहे. कोविड-19 काळात या आलिशान ट्रेनला प्रवासी लाभत नसल्याने ट्रेनच्या तिकीटांची विक्री प्रचंड मंदावली आहे. त्यामुळे ही ट्रेन चालविण्याऐवजी तिला यार्डातच उभी करणे सोयीस्कर असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. नवी दिल्ली ते लखनऊ धावणाऱ्या तेजसला 23 नोव्हेंबरपासून तर अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल धावणाऱ्या तेजसला येत्या 24 नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याचा निर्णय त्यामुळे आयआरसीटीसीने घेतला आहे.

रेल्वेची उपकंपनी इंडियन रेल्वे कॅटरींग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड(आयआरसीटीसी)मार्फत देशाची पहिली प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ चालविली जात आहे. या ट्रेनला अलिकडेच ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले होते. परंतू दिवाळीच्या दिवसांत वाढलेले प्रवासी पुन्हा कमी झाल्याने ही ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारमान 25 टक्क्यांपर्यंत घसरले
आयआरसीटीसीने नवी दिल्ली ते लखनऊ तेजस एक्सप्रेसची सुरूवात गेल्यावर्षी 4 ऑक्टोबर 2019 पासून केली होती. तर अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल तेजसचा प्रारंभ यावर्षी जानेवारीपासूनच झाला होता. ‘कोविड-19’ साथीमुळे सात महिने ट्रेन बंद राहिल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून ‘तेजस ट्रेन’ची पुन्हा सुरूवात करण्यात आली होती. कोविडच्या आधी या ट्रेनला 50 ते 80 टक्के भारमान लाभले होते. तर आता ते कमी होऊन केवळ 25 टक्क्यांवर आले आहे.

उत्पन्न कमी आणि खर्च जास्त
या आलिशान ट्रेनला चालविण्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त येत होता अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या ट्रेनला एक दिवस चालविण्याचा खर्च 15 ते 16 लाख येत असतो. याउलट संपूर्ण ट्रेनमध्ये 50 ते 60 प्रवाशांची बुकीग लाभत आहे. जर प्रवासी तिकीटाची किंमत सरासरी एक हजार रूपये जरी पकडली तरी या प्रवाशांद्वारे 50 ते 60 हजार इतके कमी उत्पन्न मिळत आहे. संपूर्ण ट्रेनची क्षमता 758 प्रवासी इतकी आहे.