हिंदुस्थानी पथकाचा झेंडा टेक चंदच्या हाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानची राजधानी टोकियोमध्ये मंगळवारी पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्यापूर्वी हिंदुस्थानी पथकाला मोठा धक्का बसला. पदकाचा दावेदार अन् ध्वजवाहकाचा मान मिळालेला लांब उडीपटू मरियप्पन थंगवेलू कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ऐनवेळी हिंदुस्थानी पथकाचा झेंडा भालाफेकपटू टेकचंदच्या हाती सोपवावा लागला. मरियप्पन थंगवेलूसह आणखी एक खेळाडू आणि चार कोचिंग स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाल्याने हे सर्वजण क्वारंटाइन झाले आहेत.

हिंदुस्थानी पॅरालिम्पिक पथकाचे प्रमुख गुरशरण सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या संघातील सहा जण विमान प्रवासादरम्यान एका कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती आम्हाला टोकियो पॅरालिम्पिक कोविड नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यामुळे मरियप्पन थंगवेलूसह थाळीफेकपटू विनोद कुमार आणि एक प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफमधील तिघांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दिमाखदार उद्घाटन

टोकियोमध्ये मंगळवारी 16व्या पॅरालिम्पिक स्पर्धेचे दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यात 75 कलाकारांनी मंत्रमुग्ध करणारी कला सादर केली. दुसरीकडे मैदानही रिकाम होते. नयनरम्य आणि गगनभेदी आतषबाजी केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पॅराअॅथलिटच्या शक्तीचा व्हिडीओ

अपंग धावपटूची व्हिडीओच्या माध्यमातून क्षमता दाखवत पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. खेळाडूंची अचंबित करणारी कामगिरी आणि प्रेक्षकांकडून तितकीच उत्स्फूर्त मिळणारी दाद या व्हिडीओच्या माध्यमातून दाखविण्यात आली. हा सोहळ्यात पॅरा एअरपोर्टची थीम वापरण्यात आली. एअरपोर्ट कर्मचाऱयांचा पाशाख घालून कलाकार मैदानावर आले. शेवटी नयनरम्य आतषबाजी झाली. जपानचे राजे नारुहितो यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाल्याची घोषणा केली.