तेलंगणात वायू दलाचं विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणात वायू दलाचं विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा येथील डिंडीगुल इथल्या वायू दलाच्या प्रशिक्षण प्रबोधिनीत विमान चालवण्याचं प्रशिक्षण सुरू असताना हा अपघात झाला.

भारतीय वायू दलाच्या अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी 8.55 मिनिटांनी वायू दलाचं पीसी एम के 2 हे विमान कोसळल्याने दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. यात एका प्रशिक्षकाचा तसंच एका प्रशिक्षणार्थी कॅडेटचा समावेश आहे.

विमान कोसळून अपघात झाला असला तरी सामान्य जनतेचं जीव किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. हा अपघात नेमका का झाला, याबाबत अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे वायूदलाने याबाबत तपास सुरू केला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.