टेलिप्रॉम्टर बंद झाला, ऐन भाषणादरम्यान मोदींचा उडाला गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी टेलिप्रॉम्टर बंद झाला आणि ऐन भाषणावेळी पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडाला. यावरून नेटकऱयांमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षानेही पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जगभरातील राष्ट्रप्रमुख सहभागी झाले आहेत. व्हीडिओ कॉन्फरसिंगव्दारे पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. टेलिप्रॉम्टरच्या सहाय्याने ते हिंदीमध्ये भाषण करीत होते. त्यांचे भाषण इंग्रजीत भाषांतर करून उपस्थितांना सांगण्यात येत होते. तेवढय़ात टेलिप्रॉम्टर बंद झाले आणि पंतप्रधान मोदी बोलता बोलता थांबले. ते गोंधळून गेले आणि काहीसे संतापले. त्या हावभावांसह स्क्रीनच्या उजवीकडे ते पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडपह्न लावला आणि समोरच्यांना ऐकू येतंय का हे ते विचारू लागले, असे या व्हीडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

इतकं खोटं सहन करू शकत नाही – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना जोरदार टोला लगावला आहे. इतकं खोटं टेलिप्रॉम्टरही सहन करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षानेही आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांवर टीका केली. ‘टेलिप्रॉम्टर म्हणत असेल, अच्छा चलता हू, दुआओ में, याद रखना.’