
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी जिल्ह्यात सुरुवातीपासूनच तापमानामध्ये वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाने उच्चांकी गाठली असताना मे महिन्याच्या शेवट्या आठवड्यात उष्णतेची लाट आली आहे. परभणी जिल्ह्याचा पारा आज मंगळवार, 28 मे रोजी कमाल 44.5 तर किमान 29.5 एवढा नोंदविला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याने आग लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. नुकतीच परभणी बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना यातूनच घडली असल्याचे चर्चीले जात आहे. विक्रमी तापमानामुळे संपूर्ण जिल्ह्यात आगीच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत उष्माघाताचे चार बळी गेले असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे. रविवारी सकाळपासूनच तापमानात मोठी वाढ झाली होती. कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला. उन्हात फिरण्याचे टाळावे, सुती कपडे वापरावेत, उष्ण पेय घेऊ नये, भरपूर पाणी प्यावे, शरिरातील क्षारांची कमी भरून काढण्यासाठी लिंबू पाणी आणि मिठ घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले केले आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेनेही आगामी काळात तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. उद्या 29 रोजी देखील कमाल तापमान 44 अंशापर्यंत तर किमान तापमान 29 अंशापर्यत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
यावर्षी जिल्ह्यात विक्रमी 47.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या 30 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक तापमान ठरले. त्यानंतर हळूहळू तापमान कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. सरत्या आठवड्यातही जिल्ह्याचा पारा 43 ते 44 अंशा दरम्यान राहिला. रविवारी परभणी जिल्ह्यात ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तविला. त्यामुळे येत्या काळातही नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाने उष्णतेच्या लाटेत नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
























































