
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत अजूनही थंडीने पाय ठेवला नसला तरीही आज पारा काहीसा उतरलेला दिसला. आज बुधवारी मुंबईचे तापमान 16 डिग्री सेल्सियस इतके होते. मात्र राज्यात चांगला गारठा पडलेला आहे. नाशिकचे तर अक्षरशः महाबळेश्वर झाले असून नाशिकचे तापमान 7.9 डिग्री सेल्सियस इतके झाले आहे. त्यामुळे येथील दवबिंदूही गोठले असून भरदिवसाही हुडहुडी भरत असल्याचे चित्र आहे. याउलट महाबळेश्वरमध्ये तापमान 10.1 डिग्री सेल्सियस इतके आहे.
विदर्भात येणार थंडीची लाट
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासांत मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने तेथे गारवा आहे. तर मुंबईत हवामान कोरडे असल्याने आणि थंड वाऱयामुळे मुंबईत पारा घसरला असून 48 तासांत पारा आणखी 1 डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे.
कशामुळे वाढला थंडीचा कडाका
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. त्यातच वायव्येकडून प्रतिचक्रवाती वारे वाहात असल्यामुळे त्यातून निर्माण होणारे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहात आहेत. मध्य महाराष्ट्रासह जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापुरात तापमान प्रचंड उतरले आहे. राज्यात गारठा वाढणार असल्याचे कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
राज्यातले तापमान डिग्री सेल्सियस
मुंबई – 16
माथेरान- 15
नाशिक- 7.9
महाबळेश्वर – 10
जळगाव- 9.4
मालेगाव – 9.4
नागपूर- 9.6
पुणे – 9.3
बुलढाणा – 10.4
चंद्रपूर – 10.6
गोंदिया – 11
परभणी – 11
धाराशीव – 12.4






























































