
मे महिन्याहून अधिक उन्हाचे चटके मार्च महिन्याच्या मध्यावरच जाणवू लागले आहेत. वाढत्या उकाडय़ामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शक्यतो दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
उत्तर तसेच पश्चिमेकडील या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे कोकण-गोव्याच्या दिशेने वाहात आहेत. त्यामुळे या परिसरात तापमानात वाढ झाली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी ट्विटवर म्हटलंय, 14 आणि 15 मार्चला मुंबई, ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. 15 मार्चला दक्षिण कोकणात उष्णतेच्या लाटेचा तर 16 मार्चला संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा. प्रादेशिक हवामानशास्त्र्ा केंद्राने (आयएमडी) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढे ते म्हणाले, येत्या दोन दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39 अंश सेल्सियस राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता. कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश सेल्सियसवर व कमाल तापमान किमान 37 अंश सेल्सियस असावे. कृपया घाबरू नका, पण काळजी घ्या.
z गेले काही दिवस मुंबईसह नजीकच्या जिह्यांमधील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी कुलाबा येथे 39.4 अंश सेल्सियस तर सांताक्रुझला 39.6 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे 40.2 अंश सेल्सियस तर डहाणू येथे 34.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर अलिबागमध्ये 38 अंश सेल्सियस तापमानाची नोंदविले आहे.
z मार्चमध्ये नेहमीच मुंबई आणि परिसरात जादा तापमान पाहायला मिळते. गतवर्षी 28 मार्चला मुंबईत 40.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. 28 मार्च 1956 रोजी मुंबईत 41.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले होते. हे मार्चमधले मुंबईत नोंदवलेले सर्वाधिक तापमान आहे.





























































