
कोरोना महामारीमुळे बंद असलेली मंदिराची दारे घटस्थापनेच्या मुहूर्तावर 7 ऑक्टोबरपासून देवाच्या दर्शनासाठी उघडणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराबरोबरच शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, त्र्यंबकेश्वर, पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांना आता आपल्या देवाला डोळे भरून पाहत मुखदर्शन घेता येणार आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱया भाविकांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. पूजेसाठी हार-फुले, नारळ, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही.
मुंबईतील सिद्धिविनायक आणि मुंबादेवी मंदिरात दिवसभरात केवळ 2500 ते 3000 भाविकांना दर्शन घेता येणार आहे. महालक्ष्मी मंदिरात 8 हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळीत खुले राहणार असून दररोज 5 हजार भाविकांना दर्शन मिळेल.
शिर्डीच्या साई मंदिरात प्रत्येक तासाला 1150 अशी 15 हजार भाविकांना दररोज दर्शनाची परवानगी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दररोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 10 काजेपर्यंत खुले राहणार आहे. यात दररोज सकाळी 6 ते 7 या केळेत स्थानिक भाविकांना, नवरात्रोत्सवात महिलांना याचा लाभ घेता येईल.
ओटी-पूजा साहित्यावर बंदी
मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांनाही ओटी अथवा पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य सोबत नेता येणार नाही. त्याच पद्धतीने श्रीपूजकांनीही भाविकांकडून ओटी अथवा पूजेचे साहित्य मंदिरात नेऊ नये. मंदिरात जे देवीचे दैनंदिन धार्मिक विधी होतात ते करावेत, अन्य अभिषेक करता येणार नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांना दर्शन नाही
मंदिरात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांखालील मुले, गरोदर महिला तसेच आजारी व्यक्तींना दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही. दर्शनासाठी येणाऱया भाविकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेले हवे. ज्या भाविकांचे कोविड-19चे दोन्ही डोस पूर्ण नसतील अशा भाविकांसाठी 72 तासांतील आरटीपीसीआर तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
































































