
टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात ग्लॅमरस, लोकप्रिय आणि ‘टेनिसची आयपीएल’ असा लौकिक असलेल्या सुप्रिमो चषकाच्या दहाव्या मोसमाचे आज लाँचिंगही जबरदस्त झाले. स्पर्धेत सहभागी 16 संघांची नावे. त्यांच्यावर उधळण केली जाणारी लाखोंची रोख बक्षिसे आणि वेगवान प्रवास करण्यासाठी वैयक्तिक पुरस्कार म्हणून देण्यात येणाऱया कार आणि स्कूटीची घोषणा सहभागी संघांना थक्क करणारी होती. येत्या 17 ते 21 मेदरम्यान सांताक्रुझ कालिनाच्या एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर ‘टेनिसची आयपीएल’ सुप्रिमो चषकाची फटकेबाजी मुंबईकरांना ‘याचि देही आणि याचि डोळा’ अनुभवता येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस आणि विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या संकल्पनेतून 2010 साली सुरू झालेल्या टेनिस क्रिकेटच्या रोपटय़ाचा आता ‘टेनिसची आयपीएल’ असा वटवृक्ष झाला असून त्याची पाळेमुळे अवघ्या हिंदुस्थानात पसरली आहेत. या स्पर्धेत मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सहा जिह्यांसह गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यातील अव्वल संघ या स्पर्धेत आपल्या चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यास सज्ज झाले आहेत. आज सुप्रिमोच्या दिमाखदार लाँचिंगला आयोजक संजय पोतनीस आणि ऍड. अनिल परब यांच्यासह प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, प्रसिद्ध क्युरेटर नदीम मेमन आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे ऍपेक्स कौन्सिल सदस्य मिलिंद नार्वेकर, नीलेश भोसले उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व संघांच्या कर्णधारांना सुप्रिमो जर्सीचे वितरण करण्यात आले.
लवकरच सुप्रिमो स्टेडियममध्ये
शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती की सुप्रिमो स्पर्धा मोठी व्हावी आणि या स्पर्धेत खेळणाऱया टेनिस क्रिकेटपटूंनाही स्टेडियममध्ये खेळता यावे. शिवसेनाप्रमुखांची इच्छा आम्ही पुढच्या वर्षी म्हणजे अकराव्या मोसमात सुप्रिमोचा थरार मुंबईच्या लोकप्रिय स्टेडियममध्ये घेण्याचा प्रयत्न करणारा आहोत. याची तयारी आम्ही आतापासून सुरू केली असल्याची माहिती आयोजक ऍड. अनिल परब यांनी दिली.
रोख बक्षिसांची उधळण
सुप्रिमो चषकात यंदाही रोख पुरस्कारांची उधळण केली जाणार आहे. त्यानुसार स्पर्धेचा विजेता 11 लाख रुपयांचे रोख इनाम आणि झळाळता चषक जिंकेल. स्पर्धेत विजेतेपदाचा निकाल अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर लागत असल्यामुळे उपविजेत्याला विजेत्यापेक्षा दोन लाख कमी म्हणजे नऊ लाखांच्या इनामाने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयोजक पोतनीस यांनी दिली. तसेच स्पर्धेचा मालिकावीर मारुती सुझुकी कारचा मानकरी ठरेल. एवढेच नव्हे तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना स्कूटी दिली जाणार आहे.
टेनिसच्या आयपीएलचा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळावा हीच इच्छा
सुप्रिमो चषकाला आम्ही ग्लॅमरस आणि लोकप्रिय केले आहे. आता त्याची ओळख ‘टेनिसची आयपीएल’ म्हणून केली जाते. पण आमच्या या आयपीएलमधले गुणवान खेळाडू खऱया आयपीएलमध्ये खेळावेत ही आमची इच्छाही आहे आणि आमचे प्रयत्नही आहेत. या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मार्गदर्शन करणार आहोत आणि मदतही, असे आश्वासन आयोजक संजय पोतनीस यांनी दिले.
सुप्रिमो चषकात राष्ट्रीय स्तरावरील संघ
‘टेनिसची आयपीएल’ असलेली सुप्रिमो चषक स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर खेळली जात असून यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिह्यातील संघांसह कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या राज्यांतील संघही खेळणार आहेत. त्यामुळे यंदाही जेतेपदासाठी काँटे की टक्कर होणार हे निश्चित आहे. स्पर्धेत एकंदर 16 संघ खेळणार असून दर दिवशी दोन साखळी सामने खेळविले जाणार असून विजेत्यांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचाही सामना खेळविला जाईल. चार दिवस साखळी सामने होणार असून उपांत्यपूर्व फेरीचा विजेता संघ 21 मे रोजी उपांत्य फेरीत भिडेल. उपांत्य फेरीच्या लढती ड्रॉ काढून खेळविल्या जातील.
आंतरराष्ट्रीय पंच सामनाधिकारी
सुप्रिमो चषकाची वाढत चाललेली लोकप्रियता पाहता यंदा या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पंच सुरेश शास्त्राr आणि एम. आर. सिंह यांची सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट संघटनेचे राष्ट्रीय दर्जाचे पंच लाभले आहेत.
सुप्रिमो चषकाचा कार्यक्रम
– 17 मे 2023
उमेश इलेव्हन (मुंबई)
एसएससीसी डोंबिवली
गावदेवी गावठण एकेएम स्पोर्ट्स (उरण)
रायगड इलेव्हन (नवी मुंबई)
– 18 मे 2023
डिंगडाँग (नियाज वॉरिअर्स) (पुणे)
रॉयल एकता (गुजरात)
विक्रोलियन्स (मुंबई)
एनबी अवध (पुणे)
– 19 मे 2023
बालाजी कंधारी किंग्ज (मुंबई)
शौर्य हर्षित (ठाणे)
उमर इलेव्हन (एंजल स्पोर्ट्स )
एफएम हॉसपेट (कर्नाटक)
– 20 मे 2023
धमाका क्लब (दिल्ली)
ग्लोबल सेंट एंजेलोज (पुणे)
शिरसाट स्पोर्ट्स (नगर)
ताई पॅकर्स (पालघर)
























































