पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये बसमधून उतरवून 14 नागरिकांची हत्या

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हल्लेखोरांनी बसमधून उतरवून 14 जणांची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचा एक व तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्यासह एकूण 14 जण ठार झाले.

 निमलष्करी दलाचा युनिफॉर्म घातलेल्या 20 पेक्षा जास्त हल्लेखोरांनी कराची ते ग्वादारदरम्यान धावणाऱ्या 6 बस माकरान कोस्टल हायकेकर अडविल्या. बसमधील 30 ते 40 लोकांना त्यांनी खाली उतरवले. प्रवाशांची ओळखपत्रे तपासून कोण पाकिस्तानी, कोण बलूच याची ओळख पटकून नंतर 16 जणांना वेगळे करण्यात आले. यावेळी दोघेजण पळून गेले. अन्य 14 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली अशी माहिती बलुचिस्तानचे महानिरीक्षक मोहसीन हास्सन बट्ट यांनी दिली.

हल्लेखोरांनी निमलष्करी दलाचा गणवेश परिधान केला होता. प्रवाशांची तपासणी करण्याच्या बहाण्याने हल्लेखोरांनी प्रवाशांची ओळखपत्रे पाहिल्याचे  बलुचिस्तानचे गृहमंत्री झिया लोगोवे यांनी सांगितले. मृत प्रवाशांची ओळख पटविण्यात येत असून हल्लेखोरांच्या तपासासाठी शोधमोहीम हाती घेतल्याचे लोगोवे यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेचा संपूर्ण अहवाल पंतप्रधान कार्यालयाने मागविला आहे. राष्ट्राध्यक्ष आरिफ अलवी यांनी या भ्याड हत्याकांडाचा निषेध करीत मृतांना श्रद्धांजली वाहिली.