कश्मीरात दहशतवाद्यांची घरात घुसखोरी; सुरक्षा दलांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱयात दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिकाऱयाच्या (एसपीओ) घरात घुसखोरी केली आणि बेछूट गोळीबार केला. यात पोलीस अधिकारी रात्रीच शहीद झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या भावाचा रविवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. या हल्ल्याने मध्य कश्मीरच्या बडगाम जिह्यात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दहशतवादी शनिवारी रात्री एसपीओ इश्फाक अहमद दार (26) यांच्या छटबूग येथील घरी घुसले. त्यांनी इश्फाक व त्यांचा भाऊ उमर अहमद दार (23) या दोघांवर बेछूट गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. दोन्ही जखमींना तातडीने स्किम्सच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे इश्फाक यांनी रात्रीच अखेरचा श्वास घेतला, तर उपचार सुरू असताना भाऊ उमर दार हे रविवारी सकाळी मरण पावले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी पोहोचून अधिक तपासाची चक्रे फिरवली आहेत.

संपूर्ण परिसरात नाकाबंदी, रात्रभर सर्च ऑपरेशन

दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून पळ काढला. त्यांचा शोध घेण्यासाठी छटबूगच्या संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या परिसरात शनिवारी रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. हल्लेखोर अजून सापडलेले नाहीत. मात्र त्यांना लवकरच गजाआड करू, असे बडगाम जिह्याचे आयजी विजय कुमार यांनी रविवारी सांगितले.

दोघा भावांच्या मृत्यूमुळे पोलीस कुटुंब गाव सोडणार

दहशतवाद्यांनी दोन भावांचा जीव घेतल्यामुळे दार कुटुंब पूर्णपणे कोसळून गेले आहे. रविवारी सकाळी दोन भावांच्या अंत्ययात्रेला हजारो लोक जमले होते. दार कुटुंबातील तिघे पोलीस दलात आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्यानंतर दार कुटुंबाने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.