
सामना प्रतिनिधी । मुंबई
टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून या शिक्षकांना सेवेतून कमी करण्याच्या तसेच पगार थांबविण्याच्या आदेशाला मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्थगिती दिली. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना नोकरीवरून कमी करू नये, अशा सूचना तावडे यांनी शिक्षण संचालकांना केल्या आहेत.
31 मार्चला टीईटी उत्तीर्ण होण्याची मुदत संपली. त्यामुळे ही परीक्षा पास नसलेल्या शिक्षकांच्या सेवा नियमानुसार संपणार होत्या. नागपूर व इतर विभागातील शिक्षकांचा पगार काढण्यात येऊ नये अशा सूचनाही वेतन अधीक्षकांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्ती मिळालेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण नसल्यास तूर्तास तरी त्यांच्या सेवा समाप्त होऊ नये, असे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.
- टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आतापर्यंत शिक्षकांना तीन संधी देण्यात आल्या होत्या.
- तरीही अद्याप बहुसंख्य शिक्षकांनी ही परीक्षा दिलेली नाही.
- आगामी शिक्षक भरतीतही टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची वर्णी लागणार नाही.




























































