टीईटी परीक्षेतील घोटाळ्याचा फटका, ‘त्या’ उमेदवारांची नियुक्ती संशयाच्या भोवऱयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकताच उघड झालेला शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्याचा फटका मागील सप्टेंबरमध्ये शिक्षकपदी नियुक्ती मिळालेल्या तब्बल 2 हजार 65 शिक्षकांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिक्षण संस्था स्तरावरील मुलाखतीचा टप्पा पार करून या उमेदवारांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. मात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन टीईटीतील गुण वाढवून देण्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी उघड केल्यानंतर हे नवनियुक्त शिक्षकही संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत.

शालेय शिक्षण विभागाकडून वर्ष 2017 मध्ये सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरतीनंतर राज्यातील विविध शाळांवर तब्बल 3 हजार 902 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून करण्यात आली होती. या भरतीमध्ये अर्ज करणाऱया उमेदवाराने 2017 पूर्वी टीईटी पात्र असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती. यापैकी 2 हजार 65 शिक्षक उमेदवारांची निवड होऊन नुकतीच त्यांची संस्थास्तरावर मुलाखत होऊन नेमणुकीची प्रक्रियाही पूर्ण झाली. तसेच उर्वरित शिक्षक उमेदवारांच्या नेमणुकीसाठी शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संस्थांना चार्ट उपलब्ध करून देत त्यावर रिक्त जागांची माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र टीईटी परीक्षा आणि राज्य परीक्षा परिषद आर्थिक गैरव्यवहाराच्या वादात सापडल्याने राज्यातील विविध शिक्षण संस्थांवर शिक्षक म्हणून जाण्यासाठी तयार असलेल्या शिक्षक उमेदवारांना आपल्या निवड आणि नियुक्तीचे काय होईल असा प्रश्न पडला आहे.

n टीईटी प्रमाणपत्रावर शंका

परीक्षा परिषदेचा गैरकारभार चव्हाटय़ावर आल्याने आतापर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बहुतांश उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर शंका उत्पन्न होऊ शकते, असे शिक्षण विभागातील अधिकाऱयांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बीएड, डीएडधारक स्टुडंट असोसिएशनचे संतोष मगर यांनी मात्र या भरतीमध्ये नियुक्ती मिळालेले सर्व उमेदवार हे प्रामाणिकपणे टीईटी परीक्षा पात्र असल्याचा दावा केला आहे. यातील अनेकांची नावे आता पवित्र पोर्टलवर आली असून त्यांना संस्थास्तरावरील नियुक्तीपत्रही देण्यात आलेली आहेत. यामुळे सध्या सुरू असलेल्या या चौकशीचा कोणताही परिणाम या भरती प्रक्रियेवर होणार नाही असेही बोलले जात आहे.