
>> कर्नल अभय बा. पटवर्धन, [email protected]
थायलंडमधील ‘थाम लुआंग’ गुहेत अडकलेली बारा मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांना प्रचंड प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बचाव कार्याची नोंद जगभरात घेतली गेली. ते आव्हानात्मक तेवढेच जिकिरीचे आणि धोकादायक होते. या मोहिमेत थायलंडच्या नौदलाला जगभरातील डायव्हर्स आणि तज्ज्ञ मदत करीत होते. त्यात हिंदुस्थानच्या किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीने विकसित केलेल्या फ्लड पंप तंत्रज्ञानाचाही मोलाचा उपयोग झाला. अर्थात अशा प्रकारचे बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत आपण नेमके कुठे आहोत? हिंदुस्थानी यंत्रणा, राजकारणी, सरकार, प्रसारमाध्यमे आणि जनता काही बोध घेणार आहे का?
थायलंडमधील एका गुहेत अडकलेली बारा मुले आणि त्यांचे प्रशिक्षक, त्यांना सोडविण्यासाठी थायलंडचे नौदल आणि जगभरातील सर्वच संबंधित यंत्रणांची सुरू असलेली अविरत कारवाई, मुलांच्या पालकांची झालेली घालमेल, बचाव कार्याचा थरार यावर गेल्या दोन-तीन आठवड्यांत संपूर्ण जगामध्ये चर्चा होत होती. आपत्ती व्यवस्थापन आणि सरकारसह अन्य घटकांचे त्यासंदर्भातील आदर्श आचरण हे या चर्चेचे केंद्रबिंदू होते.
‘वाईल्ड बोअर्स’ या फुटबॉल संघाची ही मुले ११ ते १६ वयोगटातील आहेत. २३ जून रोजी फुटबॉलची प्रॅक्टिस करीत असताना अचानक जोरदार पाऊस आल्याने ती आणि प्रशिक्षक थाम लुआंग या गुहेत शिरले. मात्र पावसाने त्यांची वाट अधिकच बिकट केली. खरं तर ही गुहा म्हणजेच थायलंडचे एक पर्यटनस्थळ आहे. थायलंड-म्यानमार सीमेवरील डोई नाँग नान/ मे साई पर्वत शृंखलेमध्ये ही गुहा आहे. या सर्व एकूण सहा पर्वतरांगा आहेत. या गुहेचे प्रवेशद्वार पहिल्या पर्वतरांगेवर असून शेवटच्या म्हणजे सहाव्या पर्वतरांगेत तिचा शेवट होतो. या प्रचंड लांबीच्या गुहेबाहेर सायकली दिसल्यामुळे ही मुले बोगद्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आणि नंतर सुरू झाला तो त्यांच्या सुटकेचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा थरार…
थायलंड सरकारकडे गुहेचा नकाशा होता. मात्र मुलं नेमकी कुठे अडकली आहेत याचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्या देशातील ३० जंगल ट्रेकर संस्थांनी या पर्वतावरून आत जाण्यासाठी एखादे ‘ओपनिंग’ सापडते का याचा शोध घेतला. त्यापाठोपाठ थायलंड सरकारच्या विनंतीला मान देऊन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, नॉर्वे, फिनलण्ड, जर्मनी तसेच चीन या देशातील १५० हून अधिक पाणबुडे (डायव्हर्स) दाखल झाले व त्यांनी शोधमोहीम सुरू केली. अर्थात हे सर्व सोपे नव्हते. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर रिचर्ड टॅन्सन आणि जॉन व्होलंथेन या ब्रिटिश पाणबुडय़ांना ही मुले प्रशिक्षकाबरोबर बोगद्यातील एका उंच जागी बसलेली आढळली. मात्र एवढे पुरेसे नव्हते. मधल्या काळात थायलंड सरकारने अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स बोअरिंग कंपनीला पाचारण केले. त्या कंपनीची हेवी डय़ुटी ड्रिलिंग मशीन तसेच पाणी उपसणारे पंप मागविण्यात आले. पर्वतावरून बोगद्याच्या दिशेने एक आरपार छिद्र (व्हर्टिकल ड्रील) करण्याची आणि बोगद्यातून पाणी बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार १३४ ठिकाणी ड्रील केले गेले आणि अडकलेल्या मुलांसाठी पाइपद्वारा गुहेत प्राणवायू आणि मिनिएचर कॅमेरा सोडण्याएवढे छिद्र केले गेले. ही मोहीम संपेपर्यंत या पंपांनी तब्बल १९२ दशलक्ष लिटर पाणी बोगद्याबाहेर काढून फेकले. यावरून या मोहिमेच्या आव्हानाची कल्पना येते. या प्रक्रियेत आपल्या देशाची आघाडीची कंपनी किर्लोस्करचे पंप तसेच इंजिनीयर्स यांची मोलाची मदत झाली हे महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानास्पद म्हणता येईल.
हे बचावकार्य ११ जुलै रोजी यशस्वीपणे पूर्ण झाले. सर्व मुले आणि प्रशिक्षक सुखरूप बाहेर आले. मात्र त्यासाठी घेण्यात आलेले एकत्रित कष्ट, त्याची आखणी आणि तंतोतंत अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञाची मदत, बचाव पथकाचे कष्ट, थायलंड सरकार आणि इतर यंत्रणांची दुर्दम्य इच्छाशक्ती या सर्व गोष्टींचा हा एकत्रित परिणाम म्हणावा लागेल. सर्वात शेवटी गुहेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये थायलंडच्या नौदलाचे चार सील कमांडोज् आणि 3 जुलैपासून त्या मुलांबरोबर राहिलेले डॉक्टर होते. सर्व लोक बाहेर आल्यानंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी ‘‘वुई आर नॉट शुअर इफ धिस इज अ मिरॅकल, सायन्स ऑर व्हॉट? ऑल द थर्टिन वाइल्ड बोअर्स आर नाऊ आऊट ऑफ केव्ह’’ अशी संयमित प्रतिक्रिया दिली. त्यावरूनही या एकूणच बचाव मोहिमेचे स्वरूप आणि महत्त्व लक्षात येते.
थायलंडची ही बचाव मोहीम एका अर्थाने संपूर्ण जगाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरू शकते. मात्र त्या सरकारने जी इच्छाशक्ती आणि तत्परता दाखवली, अचूक आखणी आणि त्यानुसार कार्यवाही केला त्या पद्धतीने सर्वांनी बोध घ्यायला हवा. शेवटी प्रत्येक आपत्ती माणसाला आणि प्रशासनाला नक्कीच काहीतरी शिकवते. थायलंडमधील या आपत्तीने तेथील सरकारला, प्रशासनाला आणि जनतेला मोठा धडा दिला. त्यातून ते शिकले आणि त्यानुसार वागले म्हणून यशस्वी झाले. आपल्या देशातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, सरकार, प्रशासन आणि जनता त्यापासून काही बोध घेणार का, हा खरा प्रश्न आहे. तो घेतला तरच कोणतीही आपत्ती कोसळल्यास त्याचे निवारण (मिटीगेशन) सुलभपणे होऊ शकेल.
थायलंड सरकारसमोर गुहेत अडकलेल्यांना काढण्यासाठी तीन पर्याय होते.
१) पावसाळा संपून गुहेतील पाणी आपोआप ओसरेपर्यंत मुलांना आहे तेथेच ठेवणे. मात्र पुढील चार महिने त्यांचे मनोधैर्य टिकेल का ही शक्यता कमी असल्याने हा पर्याय बाजूला पडला.
२) या मुलांचा बोगद्यातील नक्की ठावठिकाणा कुठे आहे याची खात्री झाल्यावर पर्वतावरून आतपर्यंत मोठे छिद्र पाडणे आणि ‘विंचिंग ऑपरेशन’द्वारा सर्व मुलांना वर ओढून बाहेर काढणे. मात्र येथेही डोंगराच्या भुसभुशीतपणामुळे मोठे छिद्र पाडताना मातीचा ढिगारा कोसळून बोगदाच बंद होण्याची भीती होती. त्यामुळे हा पर्यायदेखील मागे पडला.
३) बोगद्यात थेट जाऊन फसलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी स्कुबा सूट, हेल्मेट आणि ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवून एकेकाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढणे. या पर्यायातही अरुंद बोगद्यातील नागमोडी वळणे, टोकदार खडक, वेगवान गढूळ पाण्यात पोहणे, सरपटणे आणि सोबत मुलांना सुखरूप आणणे ही कसरत अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र त्यातल्या त्यात ती खात्रीशीर वाटल्याने हा पर्याय निवडण्यात आला.
फरक काय?
थायलंड सरकारने निर्णय तातडीने घेतले. देश आणि जगभरातील तज्ञांना तातडीने पाचारण केले. २००५ची त्सुनामी किंवा २०११ मध्ये उत्तरांचलमधील केदारनाथ येथे ढगफुटीमुळे झालेले भयंकर भूस्खलन या आपत्तींच्या वेळी आपणही या पद्धतीने हालचाल केली असती तर जीवितहानी नक्कीच कमी झाली असती.
थायलंडमधील संपूर्ण बचाव कार्याचे नेतृत्व संयमित आणि कार्यक्षम अशा एका प्रशासकीय आणि एका सैनिकी अधिकाऱ्याकडे देण्यात आले होते. ‘जॉइन्ट कमांड फॉर ऑपरेशनल रिझर्ल्ट’ची संकल्पना प्रभावीपणे अमलात आणली गेली. त्यात कोणीही ढवळाढवळ केली नाही. आपल्या येथे आपत्ती व्यवस्थापनाचे काम चार-पाच यंत्रणांच्या हातात असते. त्यांच्यात समन्वयाचा अभाव असतो. ओ का ठो माहीत नसलेले ‘तज्ज्ञ’ या पथकाला सूचना देत असतात.
अडकलेली मुले सुखरूप आहेत आणि त्यांना गुहेतूनच परत सुखरूप बाहेर काढावे लागेल याची कल्पना आल्यावर थायलंड सरकारने आवश्यक साधनसामुग्री आणि इतर साधने गुहेजवळ विनाविलंब एकत्रित केली. त्यामुळे गोंधळाला वावच राहिला नाही. याउलट नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपाच्या वेळी आपण त्या देशाकडे जी सामग्री पाठवली त्याचे ना नियोजन होते ना नियंत्रण. त्यामुळे एकाच प्रकारची सामग्री अनेकांनी पाठवल्याचे उघड झाले.
थायलंड सरकारकडे गुहेचा नकाशा असल्याने पाणबुड्यांना फारसे नेव्हिगेशन करावे लागले नाही. चारच दिवसांत ८ किलोमीटरपर्यंतची गुहा पिंजून काढत ते फसलेल्या मुलांपर्यंत पोहोचू शकले. आपल्याकडे ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलचा नकाशा ना व्यवस्थापनाकडे होता ना संबंधित यंत्रणांकडे.
या संपूर्ण बचाव कार्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप झाला नाही. कार्य सुरू झाल्यानंतर फक्त पंतप्रधान त्या ठिकाणी एकदाच आले. आपल्याकडे अशावेळी बघ्यांची झुंबड उडते. त्याशिवाय नेते मंडळींची चमकोगिरी असते.
थायलंडमधील प्रसारमाध्यमांनी या पूर्ण काळात अत्यंत संयमित वार्तांकन केले हे महत्त्वाचे. जे वृत्त सरकारी प्रवक्ता देईल तेवढेच स्पष्ट स्वरूपात दिले जात होते. आपल्याकडे मात्र अशा प्रसंगी टीआरपीच्या मागे लागून सनसनाटी करण्याकडेच कल दिसतो. त्यामुळे जनभावना विनाकारण छेडल्या जातात.
या अडकलेल्या मुलांचा प्रशिक्षक चांगथ्वांग हा उत्तम योग शिक्षक असल्याने या बिकट परिस्थितीत संयम कसा बाळगायचा, शारीरिक उैर्जा कशी टिकवून ठेवायची, एकमेकांना सांभाळत मनोधैर्य कसे टिकवून ठेवायचे हे आव्हान तो यशस्वीपणे पेलू शकला. आपल्या येथील प्रशिक्षकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती म्हणजे सगळा आनंदीआनंदच असतो.

























































