ठाणे शहराची अग्निसुरक्षा वाऱ्यावर, १५ हजार २५४ ठाणेकरांमागे फक्त एक अग्निशमन जवान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गजबजलेल्या गावदेवी मार्केटला भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर शहरातील सुमारे २७ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. १५ हजार २५४ ठाणेकरांमागे अग्निशमन विभागाच्या ताफ्यात फक्त एकच जवान असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठाणे शहर झपाट्याने वाढत असून टोलेजंग इमारती, मॉल्स, मल्टिप्लेक्स, आयटी पार्कस् उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत गावदेवी मंडईसारखी भीषण घटना घडल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे. महापालिकेचा अग्निशमन विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचे उघड झाले आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अग्निशमन दलात तब्बल ८३५ पैकी ६५८ विविध पदे रिक्त आहेत. अपुरे मनुष्यबळ, कुचकामी यंत्रणा, प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे शहराची अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे.

ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाचे एकूण ९ फायर स्टेशन आहेत तर तीन फायर बिट स्टेशन आहेत. या सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये एकूण ६५८ पदांची आवश्यकता आहे. मात्र अद्याप प्रशासनाने एकही नवीन भरती केलेली नाही. ठाणे अग्निशमन दलामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक, अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता, यंत्रचालक, फायरमन अशी पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव डिसेंबर २०१६ च्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. रिक्त असलेली ८३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र मागील कित्येक वर्षांपासून ही प्रक्रिया लाल फितीत अडकली आहे.

अग्निशमन दलाचे अधिकारी सागर शिंदे यांचे पार्थिव संध्याकाळी मुख्य अग्निशमन केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी दोन महिन्यांच्या चिमुकलीला काय उत्तर देऊ, असा हंबरडा सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी शिंदे यांनी फोडल्यानंतर नातेवाईकांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना अश्रू अनावर झाले. यावेळी अग्निशमन दलाने सागर शिंदे यांना अखेरची मानवंदना दिली.

  • सद्यस्थितीत १७४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठाणे शहराची सुरक्षा असून केवळ तीन फायरमन कर्तव्यावर आहेत.
  • काही दिवसांपूर्वी जुन्या स्टेशन रोडवरील दाभोळकर चाळीमध्ये आग लागली. ठाणे स्थानकाच्या सॅटीस पुलावरही शिवशाही बस जळून खाक झाली. ही घटना घडल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी पोहोचण्यास उशींर झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी यांनी केला होता.

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी

शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद आहे. हे अग्निशमन केंद्र रुस्तमजी संकुलाजवळ हलवण्यात आले असल्याने आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती आहे. तर एका इमारतीतील जागा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला देण्यात आली. त्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला वेळ लागतो. आता दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात दोन अग्निशमन बंब तैनात करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.