ठाण्याच्या ईस्टर्न एक्स्पेस हायवेवर नवा राष्ट्रध्वज बसवा, महापौर नरेश म्हस्के यांची आयुक्तांकडे मागणी

568

महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी थाटामाटात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेरील गोल्डन डाईज नाका येथे शंभर फूट उंचीचा राष्ट्रध्वज लावला. अवघ्या ठाणेकरांना अभिमान वाटणारी ही बाब. मात्र या राष्ट्रध्वजाची देखभाल व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे आढळून आले आहे. हा ध्वज जीर्ण झाला असून त्या ठिकाणी नवा राष्ट्रध्वज तातडीने उभारावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

गोल्डन डाईज नाका येथे उभारलेला ध्वज उंच असल्याने तो ठाण्याच्या विविध भागांतून पाहता येतो. हायवेवरून जाणाऱया प्रवाशांचा ऊरदेखील राष्ट्रध्वज बघून देशभक्तीने भरून येतो. मात्र या ध्वजाची काळजी व्यवस्थित घेण्यात येत नाही. ऊन, वारा, पाऊस यामुळे हा ध्वज अतिशय जीर्ण झाला आहे. त्यामुळे आचारसंहितेचा अवमान होत असल्याच्या तक्रारी अनेक ठाणेकरांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केल्या होत्या.

या तक्रारीची तातडीने गंभीर दखल घेऊन म्हस्के यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवले असून त्यात जुना ध्वज बदलून त्या जागेवर नवा राष्ट्रध्वज लावावा, अशी मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की राष्ट्रध्वजाची निगा ठेवण्यासाठी पालिकेने एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती, पण या कंपनीने हात झटकून ही जबाबदारी आपली नसून ठाणे पालिकेची असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रध्वज केवळ प्रसिद्धीसाठी बसवला आहे काय, असा संतप्त सवाल महापौरांनी प्रशासनाला केला आहे. जुना ध्वज बदलून तेथे नवीन ध्वज लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या