
सामना प्रतिनिधी । ठाणे
नवीन ठाणे स्थानक आणि मुंबई मेट्रो मार्गाला जोडून ठाणे शहरात उभारण्यात येणाऱ्यां जलद वाहतूक प्रकल्प अर्थात पीआरटीएस महिन्याभरात ट्रकवर येणार आहे. या अंतर्गत मेट्रोचे सादरीकरण आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात आले असून त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 103 किमी लांबीचा पहिला व पाचवा टप्पा, 34 किमी लांबीचा ट्रक आणि एकूण 60 स्थानके असा हा हायटेक प्रकल्प असून त्यामुळे शहराच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्यां महासभेत हा प्रकल्प निधीच्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार असून त्यानंतर लगेचच पीआरटीएस प्रकल्पाचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.
वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा (पीआरटीएस) या प्रकल्पाविषयी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सहा महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा केली होती. ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प कसा राबविता येईल याबाबत सूचित केले होते. त्यानंतर तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अहवाल तयार करून शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले व त्यानंतर तो महासभेसमोर सादर करण्यात आला होता. प्रकल्प मंजुरीची सर्व प्रक्रिया पार केल्यानंतर आज मुंबईत आदित्य ठाकरे यांच्यासमोर पीआरटीएसचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पाचा आर्थिक प्रस्ताव फेब्रुवारीपर्यंत महासभेसमोर सादर करण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना सूचित केले. यावेळी शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, महाराष्ट्र मेट्रो, अंतर्गत मेट्रो तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
- ठाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प असून एकूण पाच टप्प्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पहिला आणि पाचवा टप्पा एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे.
- एकूण 103 किमी लांबीच्या या प्रकल्पाचा पहिला व पाचवा टप्पा मिळून एकूण 34 किमी लांबीचा ट्रक बांधण्यात येणार असून त्यामध्ये एकूण 60 स्थानके उभारण्यात येतील.
- प्रकल्पाचे सादरीकरण पाहिल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त करून या प्रकल्पाचा आर्थिक प्रस्ताव येत्या फेब्रुवारीच्या महासभेमध्ये मंजूर करून पुढील कार्यवाही लवकर करावी, अशा सूचना केल्या.



























































