
ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत येत्या मंगळवारी काढण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेची सोडत तलावपाळी येथील गडकरी रंगायतन येथे तर नवी मुंबई महापालिकेची सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. दोन्ही महापालिकांनी सोडतीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सर्वच प्रभागांतील इच्छुकांची धाकधूक वाढली असून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
ठाणे महापालिकेची निवडणूक ३३ प्रभागांमधून होणार आहे. त्यापैकी ३२ प्रभाग हे चार सदस्यीय तर एक प्रभाग हा तीन सदस्यीय आहे. या सर्वच प्रभागांतून १३१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. या प्रभागांची आरक्षण सोडत येत्या मंगळवारी सकाळी १० वाजता तलावपाळी येथील गडकरी रंगायतनमध्ये काढण्यात येणार आहे, असे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक २८ प्रभागांमध्ये होणार आहे. त्यापैकी २७ प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग हा तीन सदस्यीय आहे. या प्रभागांची आरक्षण सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी १० वाजता काढली जाणार आहे, असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे.
दोन्ही महापालिकांसाठी होणाऱ्या सोडतीमध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास वर्ग, नागरिकांचा मागास वर्ग (महिला) आणि सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
प्रभागांच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर येत्या १७ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवसापासून प्रभागांच्या आरक्षणावर नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. सूचना आणि हरकतींसाठी अंतिम मुदत २४ नोव्हेंबर दुपारी ३पर्यंत ठेवण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभागांसाठी सूचना आणि हरकती महापालिका मुख्यालयासह नऊ प्रभाग समिती कार्यालयांत नागरिकांना सादर करता येणार आहेत. नवी मुंबई पालिकेच्या प्रभागांसाठीच्या सूचना आणि हरकती मुख्यालयासह प्रभाग कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.
सूचना आणि हरकतींचा विचार केल्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. दिलेल्या मुदतीत सूचना आणि हरकती सादर कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
ऑनलाईन सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत
सूचना आणि हरकती स्वीकारण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी नागरिकांनी सूचना आणि हरकती द्याव्यात. ऑनलाईन स्वरूपात आणि ई-मेलने पाठवण्यात आलेल्या सूचना आणि हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


























































