
वाहतूक व पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला करंजा-रेवस प्रकल्प रखडला आहे. काम अर्धवट टाकून ठेकेदारच पळाला असून त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. ३४ कोटी रुपये किमतीच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा खर्च आता वाढणार असून नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित ठेकेदाराला त्याने केलेल्या कामाची बिले देण्यात दिरंगाई झाल्याने ठेकेदार पसार झाला असल्याचे सांगण्यात येते. काम अर्धवट राहिल्याने त्याचा फटका पर्यटनालादेखील बसणार आहे.
करंजा-रेवस हा सागरी मार्गावरील महत्त्वाचा रो-रो प्रकल्प असून तो थेट कोकणशी जोडला जाणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत त्याचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत त्यावर कोट्यवधी रुपये खर्चदेखील झाले आहेत. तरीही हे काम पूर्ण झाले नाही. परिणामी रो-रो सेवा अजूनपर्यंत सुरू होऊ शकली नाही. करंजा बंदरातील रो-रो जेट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी रेवस येथील रो-रो जेट्टीचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे.
वर्षभरात प्रकल्प पूर्ण करणार
करंजा-रेवस रो-रो प्रकल्प हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या कामाला गती देण्याकरिता निवडणुकीची आचारसंहिता संपताच चालना देण्यात येईल असे सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विलंब होणार असल्याने कामाचा खर्च वाढणार असून लवकरात लवकर सर्व अडचणी दूर होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सात वर्षे काम सुरू
रेवस-करंजा रो-रो प्रकल्पासाठी २५.७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडून सुमारे २० कोटी रुपये आणि उर्वरित निधी राज्य शासन व स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून रेवस येथील रो-रो जेटीचे बांधकाम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने केलेल्या दिरंगाईमुळे काम रखडले.
- प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काही प्रमाणात बांधकाम केले आहे, तर ब्रेक वॉटर जेट्टी, ड्रेझिंग, वाहनतळ व जोडरस्त्यांची कामे करण्यात आली आहेत, पण अन्य कामांना मात्र गती मिळालेली नाही.
- समुद्रातील पायलिंग अजूनही अपूर्णावस्थेत आहे. त्यातच प्रकल्पाचा ठेकेदार काम अर्धवट टाकून पळून गेल्याने संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली आहे.
- मुंबई सागरी महामंडळाचे करंजा रो-रोचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराचा शोध सुरू केला असून नव्याने निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मनीषा मेतकर यांनी दिली.






























































