
चिकन, उकडलेली अंडी, वडापाव खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. पाचही जणांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. भाईंदरमधील बजरंग नगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मीरा-भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौर्या कुटुंबाने रविवारी रात्री जेवणात चिकन, भात, उकलडलेली अंडी आणि वडापाव खाल्लं. जेवणानंतर काही वेळातच पती-पत्नी, मेहुणा आणि तीन मुलींना, पोटदुखी उलट्या आणि जुलाब होऊ लागले. सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनानंतर प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.
रमेश मौर्या, नीलम मौर्या आणि राजकुमार मौर्या यांच्या भाईंदरमधील डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 6 वर्ष आणि 8 वर्षाच्या दोन मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कुटुंबीयांना नेमकं कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली याबाबत फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल, असं कांबळे यांनी सांगितले.