
चोवीस तास गजबजलेल्या घोडबंदर रोडवर सेवा रस्ते मूळ रस्त्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. तसेच मेट्रोची कामेही करण्यात येत असून कॅडबरी मेट्रो स्टेशनवर छत टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवर ६ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मेट्रो स्टेशनच्या कामामुळे रात्री ११ ते पहाटे ५ या दरम्यान कॅडबरी जंक्शनवर वाहनांना नो एण्ट्री करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक फिरवण्यात आली असून आणखी पाच दिवस ठाणेकरांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.
घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवरवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी छत टाकण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम ३० टन मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. ही क्रेन मुंबई-नाशिक वाहिनीवर कॅडबरी उड्डाणपुलावरील मुख्य मार्गावर उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे. यामध्ये पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा देण्यात आली आहे.
येथे प्रवेश बंद
मुंबईकडून नितीन ओव्हरब्रीजवरून नाशिककडे घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितीन ब्रीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
घोडबंदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहने ही नितीन ब्रीज चढणीच्या सुरुवातीच्या दुभाजक येथून स्लीप रोडने नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन येथून स्लीप रोडने पुढे कापूरबावडीवरून इच्छितस्थळी जातील.






























































