
सामना ऑनलाई। ठाणे
देशाच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारा ठाणे हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ असून तो राज्यात सर्वात मोठा म्हणून ओळखला जातो. 2009 चा अपवाद वगळता शिवसेना-भाजप युतीच्या मागे येथील मतदार ठामपणे उभा राहिला. 1989 पासून ठाणे मतदारसंघातून युतीचे आठ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. गेल्या पाच वर्षांत खासदार किती कामे करू शकतो, हे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मतदारांना दाखवून दिले. शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहणार असून यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही कायम राहणार आहे. विकासकामांच्या जोरावरच शिवसेना-भाजप युती बाजी मारणार असून राष्ट्रवादीने पडेल उमेदवार दिल्याने ठाण्यातील विजयाचा ’आनंद’ खऱया अर्थाने पुन्हा युतीच्या कार्यकर्त्यांनाच अनुभवण्यास मिळणार आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? अशी चर्चा काही दिवसांपासून रंगली होती.माजी मंत्री गणेश नाईक यांना आग्रह केला होता.पराभवाच्या भीतीने नाईकांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील पडेल उमेदवार आनंद परांजपे यांना आता जबरदस्तीने घोडय़ावर बसवावे लागले.
मीरा-भाईंदरमध्ये शून्यात
मीरा-भाईंदरमध्ये गिल्बर्ट मेंडोन्सा हे शिवसेनेत आल्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था कोमात गेलेल्या रुग्णासारखी झाली आहे. या पालिकेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक सध्या नाही. मेंडोन्सा यांना विधानसभा निवडणुकीत सुमारे 60 हजार मते मिळाली होती. मात्र नंतर ते गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही.
ठाण्यात राष्ट्रवादीला फुटीने घेरले
ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजीची परंपरा आताही कायम आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यातील वाद वरिष्ठांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले असले तरी त्यांचे मनोमिलन झालेले नाही.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ठाण्यातील पदाधिकाऱयांशी संपर्क साधला, तेव्हा राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते. या धुसफूसीचा फटका परांजपे यांना बसणार आहे.
रेल्वेचे अनेक पादचारी पूल हे परवानगीमध्ये गेल्या काही वर्षांपासून अडकले होते. त्या सर्वच पुलांचे काम विचारे यांनी थेट रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करून मार्गी लावले.
मीरा-भाईंदरमधील मच्छीमारांचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न सोडवले.
दिघा रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाली आणि आता काम सुरू झाले तर सीवूड रेल्वे स्थानकाचे कामही पूर्ण झाले.
कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे मार्गाचे काम पाठपुरावा करून मार्गी लावले.
विधानसभा मतदारसंघ व आमदार
ओवळा-माजीवडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे संजय केळकर (भाजप)
मीरा-भाईंदर नरेंद्र मेहता (भाजप)
ऐरोली संदीप नाईक (राष्ट्रवादी)
बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप)
ठाणे लोकसभा 2014
राजन विचारे, शिवसेना – 5,95,364
संजीव नाईक, राष्ट्रवादी – 3,14,065
अभिजित पानसे, मनसे – 48,863
संजीव साने, अपक्ष – 41,535
































































