
ठाणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच हरकती व सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला. त्यातील २७० तक्रारींवर पालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनीदेखील तुफान गर्दी केली होती. प्रभाग रचना करताना अनेक ठिकाणी अनपेक्षित बदल करण्यात आले असून काही प्रभागांच्या तर सीमा बदलल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप झाला. त्यामुळे ठाण्याची प्रभाग रचना मतदारांसाठी की सत्ताधाऱ्यांसाठी, असा खडा सवाल शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रभाग रचनेला घेण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तरे देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ३३ प्रभाग जाहीर करण्यात आले असून एकूण १३१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभाग रचनेच्या घेण्यात आलेल्या हरकतींवर नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी हे स्वतः उपस्थित होते. या सुनावणीला शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांसह अनेक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. या सुनावणीत आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत अनेक गंभीर आरोप केले.
वॉर्ड फोडून सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक कसे निवडून येतील याकडे लक्ष दिले आहे. अधिकाऱ्यांनी घरात बसून वॉर्डची रचना केली आहे. दरम्यान गणेशोत्सवामुळे काही लोकांना हरकती आणि सूचना नोंदवता आल्या नाहीत यामुळे काही दिवस सुनावणी पुढे ढकलावी.
-राजन विचारे (शिवसेना नेते, माजी खासदार)
केवळ एका प्रभागाची नव्हे तर संपूर्ण शहराचीच वाट लावली आहे. प्रारूप रचना गणपतीपूर्वी प्रसिद्ध केली आणि सुनावणी गणपतीनंतर ठेवली. त्यामुळे पुढील तारखेला पुन्हा सुनावणी घ्यावी, आम्हाला योग्य संधी द्यावी.
-अविनाश जाधव (मनसे जिल्हाध्यक्ष)
प्रभाग रचनेच्या नकाशांमध्ये हद्द दिसत नाही, सीमा चुकवण्यात आल्या आहेत. सोयीचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
-विक्रांत चव्हाण (शहर अध्यक्ष, काँग्रेस)
नवी मुंबईच्या प्रभाग रचनेवर आज मॅरेथॉन सुनावणी
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर उद्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुनावणी होणार आहे. या प्रभाग रचनेवर २ हजार ५५१ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे उद्या होणारी सुनावणी मॅरेथॉन होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २८ प्रभागातून होणार असून १११ नगरसेवक महासभेत जाणार आहेत. या प्रभाग रचनेवर आलेल्या हरकर्तीची सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या उपस्थितीत सकाळी दहापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्या नागरिकांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे, त्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. हरकत घेणाऱ्या नागरिकांनी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.