एकविसावं वरीस लग्नाचं गं बाई! मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलींचे लग्नाचे वय आता 18 वर्षांवरून 21 वर्षे केले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. देशात सध्या मुलीचे लग्नाचे वय 18 तर मुलाचे लग्नाचे वय 21 वर्षे आहे. नव्या विधेयकामुळे मुला-मुलींच्या लग्नाचे वय आता एकसमान म्हणजे 21 वर्षे होणार आहे.

संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात बालविवाह प्रतिबंधक कायदा-2006 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार देशभरातील समाजात असलेल्या वैयक्तिक कायद्यातील तरतुदींनुसार विवाहाचे वय एकसमान ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षाआधी मुलींच्या वयासंदर्भात ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यासाठी समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. स्पेशल मॅरेज ऍक्ट आणि बालप्रतिबंधक विवाह कायद्यानुसार मुलींचे लग्नाचे वय 18 तर मुलाचे वय 21 वर्षे आहे.

निती आयोगाने केली फोर्सची स्थापना

जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने निती आयोगाला डिसेंबर 2020 मध्ये शिफारशी सादर केल्या होत्या. टास्क फोर्सची स्थापना मुलींच्या लग्नाच्या वयासह मातृत्वाचे वय आणि त्यासंदर्भातील बाबी, माता मृत्युदर कमी करण्याची आवश्यकता, पोषण सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी केली होती.

टास्क फोर्सच्या शिफारशी

मुलींचे लग्न 18 वर्षांपर्यंत होत असल्यामुळे मुलांच्या बरोबरीने रोजगार मिळवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, मात्र मुलांना 21 वर्षांपर्यंत ही संधी मिळते. मुला-मुलींचे वय समान केल्यामुळे दोघांनाही समान संधी मिळेल.

देशभरातील विविध जातीधर्माच्या समाजघटकांनी मुलीच्या लग्नाचे वय 22 ते 23 करण्यावर संमती दर्शवली आहे. त्यामुळे मुलांच्या बरोबरीने मुलींच्या लग्नाचे वयही 21 वर्षे करण्याची शिफारस टास्क फोर्सने केली आहे.