माढा तालुक्यात आज दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची पोलखोल केली. अतिशय धीम्या गतीने होत असलेल्या कामामुळे माढा-बार्शी रस्त्यावरील बेंद ओढय़ावरील पूल खचला असून, वडशिंगे गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून पूल पार करावा लागत आहे.
बेंद ओढय़ावरील पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. गेल्या दोन वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीसाठी माढा व वडशिंगे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. मात्र, शासनाच्या दफ्तरदिरंगाईचा फटका बसून काम वेळेवर सुरू झाले नाही. मागील काही महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली. मात्र, अतिशय धीम्या गतीने काम सुरू आहे.
गेल्या तीन-चार दिवस सुरू असलेल्या पावसाने बेंद ओढय़ावरील काम सुरू असलेल्या पुलावरील रस्ता खचला आहे. पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, पुलावरून पाणी वाहत आहे. माढा, वडशिंगे, तसेच आसपासच्या गावातील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून पूल पार करीत आहेत. तरीही ढिम्म प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून बेंद ओढय़ावरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित अधिकारी ठेकेदार पोसण्याचे काम करीत आहेत. पावसाळय़ात या पुलावर मोठी दुर्घटना घडली तर संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना जबाबदार ठरविणार का?
– शंभूराजे साठे, माढा