डहाणूतील कंक्राडी नदी प्रदूषणाचा खटला आठ वर्षांपासून प्रलंबित; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पाठपुरावाच नाही

येथील कंक्राडी नदीतील प्रदूषणाचा खटला गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याबाबत कोणताही पाठपुरावा गांभीर्याने न केल्याने प्रदूषण करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. लवकरात लवकर कंक्राडी नदीच्या प्रदूषणाचा खटला निकालात काढावा, अशी मागणी ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टीस’ या संघटनेने केली आहे.

कंक्राडी नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने डहाणूतील खाडी, भूजल आणि पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. २०१७ मध्ये करण्यात आलेल्या पाणी परीक्षणाच्या आधारावर हा खटला डहाणू न्यायालयात दाखल केला होता. दरम्यानच्या काळात नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र या गंभीर प्रकरणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि त्यांचे वकील दुर्लक्ष करत असल्याचे ई-कोर्टाच्या माहितीवरून समोर आले आहे.

‘सोसायटी फॉर जस्टीस’च्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या कामकाजाचा तपशील (रोजनामा) तपासला असता अनेक तारखांना मंडळाचे अधिकारी किंवा वकील गैरहजर असल्याचे दिसून आले. ऑ गस्ट २०२३ मध्ये पोलिसांचा अहवाल आला तर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रथमच जबाबदार अधिकारी न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे १० डिसेंबर २०२५ रोजीच्या कामकाजात मूळ अर्जावरच आदेश झाल्याचे दिसत असल्याने हा दावा निकाली निघणार का, अशी शंका व्यक्त होत आहे.