रावसाहेब दानवेंविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगर शहरात येवून 300 कोटींचा निधी देणार असल्याचे घोषीत केले. एक प्रकारे हा प्रलोभनाचा प्रकार असून या संदर्भात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केतन गुंदेचा यांनी केली आहे.

गुंदचा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नगर महानगरपालिका 2018 ची सार्वत्रिक निवडणुकीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा घडला आहे. भारतीय जनता पार्टीने रविवारी दि. 25 रोजी सायंकाळी 7 वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा सावेडीतील भिस्तबाग चौक येथे आयोजित केली होती. या सभेवेळी नगर जिल्हाचे पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी हे देखील उपस्थित होते. त्यावेळी प्रचाराच्या शुभारंभाचे भाषण करताना रावसाहेब दानवे यांनी आचारसंहिता काळात नगरकरांना मतदान करण्याचे आवाहन करताना आमिष दाखवले. जर नगरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली तर नगरचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपा सरकार 300 कोटी रुपयांचा निधी देईल असे त्यांनी परस्पर जाहीर केले. विधान सभेचे अधिवेशन सुरु असतांना आणि नगर महानगरपालिकेची नगर सेवक पदासाठीची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना अशा प्रकारे नगरकरांना सरकारी योजनेचे व भरीव निधीचे आमिष व याची घोषणा करणे हा प्रकारे आचार संहिता भंग होत नाही का? तरी या तक्रारीची तात्काळ दखल घेवून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा व योग ती कारवाई करावी, असे त्यांनी नमुद केले आहे.