
सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलामुळे हजारो स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा उरण, नवी मुंबईकडे पाठ फिरवली आहे. यामुळे दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या विविध स्थलांतरित पक्ष्यांचे यंदा दर्शन दुर्लभ झाले आहे. पेलिकन, क्रेन अवाक, सीगल, फ्लेमिंगो, युरेशियन टील, नॉर्दर्न पिनटेल या परदेशी पाहुण्यांनी उरण, नवी मुंबईचे तिकीटच काढले नसल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये निराशा आहे.
जेएनपीए, पाणजे, डोंगरी, गव्हाण-न्हावा, करंजा खाडीकिनारा आणि पाणथळी जागा, जलाशय आदी ठिकाणे स्थलांतरित पक्षांची आश्रयस्थाने आहेत. पाणथळी, जलाशये आणि खाडीकिनाऱ्यावर स्थलांतरित पक्षी दरवर्षी हिवाळ्यात उरण परिसरात दाखल होतात. पाणथळी आणि जलाशयात
खुबे, मासे, शेवाळ, कृमी, कीटक आदी पक्ष्यांचे आवडते खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या परिसरात हिवाळा संपेपर्यंत त्यांचा मुक्काम असतो. मात्र जानेवारी सुरू झाला तरी स्थलांतरित पक्षी आलेले नाहीत अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली.
- दरवर्षी पावसाळा संपताच हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ सुरू होतो.
- हवामान, अन्नाची उपलब्धता, प्रजनन व सुरक्षित वातावरणासाठी हिंदुस्थानात ३७० प्रजातींचे पक्षी स्थलांतर करतात.
- स्थलांतरित पक्षी सूर्य, तारे, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आधार घेऊन दिशा ओळखतात.
- युरोप, ऑस्ट्रेलिया, सैबेरिया, मंगोलिया, पाकिस्तान, मध्य आशिया, दक्षिण आफ्रिकेतून पाच- दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून पक्षी येतात.


























































