
सामना प्रतिनिधी । मुंबई
बिटकॉईनसारख्या आभासी चलनाचा विषय सविस्तर मांडणाऱया ‘बिटकॉईन’ आणि ‘द ग्रेट गेम: 1917’ या जयराज साळगावकर यांच्या दोन पुस्तकांचे नुकतेच शानदार प्रकाशन करण्यात आले. बिटकॉईनचे अस्तित्व आणि तंत्रज्ञानाचा एक आविष्कार तसेच जगाच्या अर्थव्यवस्थेला मिळालेले नवे वळण अशा अनेक विषयांना या पुस्तकांच्या माध्यमातून हात घालण्यात आला आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकांबद्दल मान्यवरांनी आपली मते मांडली. बिटकॉईनमुळे डिजिटल करन्सीचे नवे दालन खुले झाल्याचे पत्रकार उदय निरगुडकर यांनी सांगितले. तंत्रज्ञानातील भरारीप्रमाणे या चलनाची मागणीही वाढेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. तर कुमार केतकर यांनी ‘द ग्रेट गेम: 1917’ आणि ‘बिटकॉईन’ या दोन्ही पुस्तकांचे विषय वेगळे असले तरी त्यातील एक समान धागा म्हणजे विध्वंसावर आधारित नवनिर्मिती असल्याचे केतकर म्हणाले. संदीप वासलेकर यांनी हे पुस्तक म्हणजे मध्यपूर्वेचा इतिहास दाखवणारे असल्याचे सांगितले. तर डॉ.नरेंद्र जाधव यांनी बिटकॉईनसारखा विषय समजून घेण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे सांगितले. या विषयावर अजूनतरी इंग्रजीत पुस्तक आलेले नाही. अशा विषयाला हात घालण्याचे धारिष्टय़ केल्याबद्दल साळगावकर यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.



























































