कनिष्ठ लिपिकाने तडजोड शुल्काची ५५ लाख रुपयांची रक्कम परस्पर गायब केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

रेल्वे विभागातील प्रवाशांचे तिकीट हडप करण्याचा प्रकार ताजा असतानाच प्रादेशिक परिवहन विभागात दंडासाठी आलेल्या तडजोडीच्या रक्कमेसाठी बनावट पावत्या वापरुन नांदेडच्या प्रादेशिक परिवहन विभागातील कनिष्ठ लिपिक शेख जाकेर हुसेन मौलाना याने ५५ लाख रुपयांचा चुना परिवहन विभागाला लावल्याने त्यांच्याविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे विभागात नुकताच तिकीटांचा घोटाळा उघडकीस आला होता व प्रवाशांच्या तिकीटांची रक्कम रेल्वेकडे बँकेत न भरता ती परस्पर हडप केल्याचे उघडकीस झाले होते. हा प्रकार ताजा असतानाच नांदेडच्या आरटीओ विभागात देखील कनिष्ठ लिपिक शेख जाकेर हुसेन मौलाना याने तडजोड शुल्काची रक्कम परस्पर गायब केल्याचे उघडकीस आले आहे.

शेख जाकेर हुसेन मौलाना हा नांदेड येथील आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक तथा सहायक रोखपाल म्हणून कार्यरत आहे. त्याच्या ताब्यात असलेल्या पावती पुस्तकात खोट्या नोंदी करुन तडजोड शुल्काची रक्कम त्याने परस्पर गायब केली. २६ ऑक्टोबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत त्याने वाहन दाव्यातील तडजोड शुल्क व मागणी शुल्क संगणकीय पध्दतीने न घेता मुद्रीत पावत्यांचा उपयोग करुन स्वीकारली. तसेच ताब्यातील पावती पुस्तकात खोट्या नोंदी करुन त्या खऱ्या असल्याचे वेळोवेळी भासविले. अशा प्रकारे अपहार करत त्याने ५४ लाख ९७ हजार ९२३ रुपये शासनाच्या तिजोरीत न भरता परस्पर विल्हेवाट लावली.

सहायक रोखपाल म्हणून कार्यरत असताना एकूण २८९ प्रकरणांमध्ये शुल्कापोटी जमलेले ५६ लाख ९ हजार रुपये शासकीय खात्यात भरणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात पावती पुस्तकातील स्थळप्रत व कॅशबुकमध्ये केवळ १ लाख १२ हजार रुपये भरुन उर्वरित रक्कमेचा अपहार केला. ही बाब चौकशीत समोर आल्यावर रोखपाल शेख जाकेर हुसेन मौलाना यांच्याकडून खुलासा मागविला असता १९ नोव्हेंबर २०१८ रोजी ७ लाख ६० हजार रुपये कार्यालयात जमा केले. अपहार केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित ३३ लाख ३७ हजार रुपये येणे बाकी असल्याची तक्रार ग्रामीण ठाण्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी २३ नोव्हेंबर रोजी दिली. त्यानुसार सहायक रोखपाल शेख जाकेर हुसेन मौलाना यांच्याविरुध्द अपहाराचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली कदम व कॉनस्टेबल राजू हुमनाबादे हे करीत आहेत. यातील आरोपीने कार्यालयाबाहेर झेड. एम. शेख नावाने खासगी कार्यालयही थाटले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. काही वर्षापूर्वी नांदेड आरटीओ कार्यालयातील बनावट शिक्का घोटाळ्याने सबंध मराठवाड्यात खळबळ उडविली होता. आता पुन्हा एकदा या अपहाराच्या निमित्ताने हे कार्यालय प्रकाशझोतात आले आहे.