सरन्यायधीशांवर बूट फेकणाऱ्याची तीन तासात सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून तक्रार दाखल न झाल्याने कोणतीही कारवाई नाही

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. राकेश किशोर याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची तीन तास चौकशी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणात तक्रार दाखल न झाल्याने हल्लेखोराला सोडून देण्यात आलं. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सरन्यायाधीश गवई व न्या. के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होती. त्यावेळी अचानक राकेश किशोर हा घोषणाबाजी करत गवई यांच्या टेबलाच्या दिशेने गेला. त्याने बूट काढून तो सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडले आणि बाहेर नेले. बाहेर नेले जात असतानाही तो ‘सनातन का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत होता, असे पीटीआयने म्हटले आहे.