
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले अंधेरी येथील ‘द लीला’ हॉटेल अखेर सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रयत्नानंतर हे हॉटेल सुरु करण्यात आले असून यामुळे येथील कामगार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. 2 नोव्हेंबरपासून हे हॉटेल सुरु करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून अंधेरी येथील ‘द लीला’हॉटेल बंद होते. त्यामुळे येथील कामगार हवालदिल झाला होता. यासाठी भारतीय कामगार सेनेच्यावतीने अनेक प्रयत्न करुनही हॉटेल सुरु होत नसल्याने कर्मचाऱ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष घालून मार्ग काढण्याची सूचना केली. त्यानुसार संजय राऊत यांनी हॉटेलचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विवेक नायर आणि उपाध्यक्ष दिनेश नायर यांच्याशी संपर्क साधून हॉटेलमध्ये कामगार प्रतिनिधी व मालक यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत व्यवस्थापनास विनंती करुन बंद असलेले हॉटेल त्वरीत सुरु करुन कामगारांना नोकऱ्या द्याव्यात. काही अडचणी असल्यास आम्ही आपणास सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
संजय राऊत यांच्या या आश्वासनानंतर हॉटेल व्यवस्थापकांनी अखेर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 नोव्हेंबरपासून हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय कामगार सेना आणि हॉटेल व्यवस्थापनात करारही करण्यात आला आहे. करारावर व्यवस्थापनाच्या वतीने दिनेश नायर आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते सुर्यकांत महाडीक, चिटणीस प्रमोद गावकर, कामगार युनिट कमिटीतर्फे अध्यक्ष सहदेव पाताडे, सरचिटणीस अतुल कोलते, हितेश राजपूत आणि तेजेश भोजणे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
























































