मराठवाडा विद्यापीठात अनुत्तीर्णांना उत्तीर्ण करणारे रॅकेट कार्यरत, युवासेनेचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटचा पर्दाफाश सिनेट सदस्य तथा युवासेनेचे सहसचिव प्रा. सुरज दामरे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये केला. परंतु विद्यापिठातील कुलगुरु आणि परीक्षा विभागातील संबंधित जाणिवपूर्वक यास पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. केवळ चौकशी समितीचे नाटक करण्याचे काम झालेले आहे. या विरुध्द आता युवासेना आंदोलन सुरु करणार असल्याचे प्रा.सुरज दामरे यांनी सांगीतले. लातूर येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रासमोर युवासेनेच्यावतीने बोंब ठोकणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांना पास करणारे रॅकेटच कार्यरत आहे. लातूर शहरातील एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील पेपर तपासणीच्या केंद्रामध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे पुरावे विद्यापीठाकडे, राज्यपालांकडे सादर करण्यात आलेले होते. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या मुलीचे गुण वाढवण्यात आलेले होते. प्रात्यक्षिक परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अधिक गुणदान झालेले होते. उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याचा गुन्हाही करण्यात आलेला होता. याचे सर्व पुरावे सादर करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रा.सुरज दामरे यांनी केलेली होती.

परंतु या रॅकेटमधील सहभागी असणाऱ्यांना विद्यापिठाचे कुलगुरु आणि परिक्षा विभागातील संबंधित, परीक्षा नियंत्रकाचे काम करणारे मान्यवर यांचेच अभय असल्याचे दिसून येत आहे. प्रा.सुरज दामरे यांनी तक्रार केल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेण्यात आलेली नव्हती. परंतु जेंव्हा हा सारा घोटाळा वृत्तपत्रांतून चव्हाट्यावर आला तेंव्हा मात्र केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करण्यात आले.

२१ ऑगस्ट रोजी विद्यापिठात चौकशी समितीसमोर उपस्थित रहावे असे कळवण्यात आलेले होते. चौकशी समितीने २१ ऑगस्ट रोजी तक्रारदार प्रा.सुरज दामरे यांना बोलावले तसेच ज्यांच्याविरोधात तक्रार होती त्यांनाही बोलावण्यात आलेले होते. मात्र तब्बल तीन महिण्यांपेक्षाही अधिक काळ लोटला तरी पुढील कांहीच कार्यवाही झालेली नाही. या रॅकेटविरुध्द विद्यापिठ कांही कारवाई करणार किंवा नाही हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. केवळ चौकशी समितीचा फार्स करण्यात आला.

विद्यापिठाच्या कुलगुरुंच्या आणि परिक्षा विभाग व परिक्षा नियंत्रकांच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात युवासेना आक्रमक आंदोलन सुरु करणार आहे. प्रांरभी लातूर येथील विद्यापीठाच्या उपकेद्रासमोर या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी बोंब ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रा.सुरज दामरे यांनी सांगीतले.