
बोरिवलीतील 38 वर्षे जुन्या पेपर स्टॉलवर पालिकेने जेसीबी फिरवला आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे या वृत्तपत्र विव्रेत्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपर स्टॉलवर पालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक असून याप्रकरणी आपल्याला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी या वृत्तपत्र विव्रेत्याने केली आहे.
वृत्तपत्र विव्रेते संजय पावसे गेले 38 वर्षे बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कच्या गेटबाहेर पेपरचा स्टॉल लावतात. बुधवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांनी स्टॉल बंद केला आणि हा स्टॉल त्यांनी जवळच असलेल्या कस्तुरबा पोलीस चौकीजवळ साखळीने कुलूप लावून ठेवला. सायंकाळी महानगरपालिकेने या स्टॉलवर कारवाई केली. स्टॉलवर बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघ व सर्व वर्तमानपत्राची नावे टाकलेली असतानादेखील कुलूप तोडून स्टॉल रस्त्याच्या पलीकडे नेऊन त्याच्यावर जेसीबी फिरवला. त्यामुळे संजय पावसे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वृत्तपत्र विव्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई करू नये असा पालिकेचा जीआर असताना आपल्या स्टॉलवर कारवाई कशी काय झाली, असा सवाल पावसे यांनी उपस्थित केला असून याप्रकरणी आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.