पु्न्हा एकदा बसणार पावसाचा तडाखा; या भागात गारपिटीची शक्यता, जाणून घ्या राज्यातील हवामानाची स्थिती

राज्याच्या विविध भागांना गेल्या दिवसांपासून पावसानं झोडपलं असून तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. काही भागांना अवकाळीचा फटका बसला आहे तर काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी भिजवलं आहे. पुढील 24 तासात राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यावर काही काळ गारवा अनुभवल्यानंतर पुन्हा उकाड्याची स्थिती निर्माण होते.

राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कायम राहणार असून, कमाल तापमानात वाढ नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नगर आणि नाशिकच्या काही भागांमध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे.

कोकणात उष्णतेच्या लाटेचा येलो अॅलर्ट

मान्सून पूर्व पावसानं काही भागात वातावरणात गारवा आणला आहे. तर कोकणात मात्र पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.