
हेलिकॉप्टर किंवा विमान दुर्घटना घडल्यानंतर अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा सर्वात आधी ‘ब्लॅक बॉक्स’ शोधतात. याच धर्तीवर चक्क बाईकसाठी ‘ब्लॅक बॉक्स’ तयार करण्याची किमया शिवांश विक्रम या विद्यार्थ्याने केली आहे. बाईकचा अपघात झाल्यास त्या जागी मोठय़ाने सायरन वाजेल. इतकेच नाही तर हे उपकरण दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना सावध करेल आणि नोंदणीकृत मोबाईलवर जीपीएसद्वारे लाइव्ह लोकेशन आणि एसएमएसद्वारे लिंक पाठवेल.
शिवांश हा उत्तर प्रदेशातील दाऊदपूर येथील रहिवासी आहे. त्याने कैलास इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी ऍण्ड मॅनेजमेंटमधून बी.टेक पूर्ण केले आहे. तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्याने हे उपकरण तयार केले आहे. उपकरणाला त्याने ‘मोटारसायकल ऑटोमेशन सेफ्टी सिस्टम’ (मास) असे नाव दिले आहे. या कामात त्याला प्रोफेसर आलोक श्रीवास्तव यांची साथ लाभली. उपकरणाच्या निर्मितीसाठी अवघ्या 600 ते 700 रुपयांचा खर्च येतो. लखनौ येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीने शिवांशच्या संशोधनाला मान्यता दिली आहे. सध्या तो या उपकरणासाठी पेटंट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानंतर वर्षभरात हे उपकरण बाजारात उपलब्ध होईल, असे शिवांशने सांगितले.
हेल्मेटशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही
या उपकरणात दोन चीप बसवल्या आहेत. एक चीप हेल्मेटमध्ये आणि दुसरी इंजिनमध्ये बसवली आहे. हेल्मेटमध्ये एक छोटय़ा आकाराची बॅटरी असून जी सहा ते आठ तासांचा बॅकअप देते. चालक जोपर्यंत हेल्मेट घालणार नाही तोपर्यंत बाईक सुरू होणार नाही. हेल्मेट घालताच 20 सेकंद बीपचा आवाज येईल. हेल्मेटमध्ये एक बटण आहे जे दाबताच बीपचा आवाज बंद होईल.
असे काम करेल उपकरण
या तंत्रज्ञानाअंतर्गत बाईकचे इंजिन स्टार्ट होताच दोन्ही चीप रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून कनेक्ट होतील. तीव्र आघात झाल्यास हेल्मेटमधील चीप गाडीचे इंजिन बंद करेल आणि हेल्मेटवरील जीपीएस यंत्र दुचाकीस्वाराच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर लोकेशन पाठवेल. जोपर्यंत बॅटरी कार्यरत आहे तोपर्यंत सायरन वाजत राहील. जेणेकरून अपघात झालाय त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांनाही कळू शकेल.





























































