
IPL च्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला पाहिजे तसा परफॉर्मन्स दाखवता आलेला नाही. त्यांना ४ सामन्यांपैकी अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळाला तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सचा (MI)अक्षरश: धुव्वा उडवला. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठे विधान केले आहे. मुंबई इंडियन्सला आता आत्मपरीक्षण करण्याची आणि लय मिळवण्याची नितांत गरज आहे, असं हार्दिक पंड्याने म्हटले आहे. तसेच आपल्या संघाच्या पराभवाचे कारणही त्याने सांगितले आहे.
सामन्या नंतर बोलताना पंड्याने कबुल केले की, सामन्यावर जबरदस्त पकड मिळवण्याऐवजी केवळ धावांचा पाठलाग करण्यातच संघाची शक्ती खर्च होत आहे. आम्ही ठरवलेल्या गोष्टी काम करत नाहीये.
फिल सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने ४ बाद २३९ धावांचा डोंगर उभा केला होता. २४० धावांचा पाठलाग करताना शेर्फेन रदरफोर्डने ३१ चेंडूत नाबाद ७१ धावांची आतषबाजी केली, तरीही मुंबईला ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मोसमातील तिसऱ्या पराभवानंतर आणि पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर घसरल्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘मला वाटते आम्ही खूप जास्त धावा दिल्या. त्यामुळे आम्ही पिछाडीवर राहून धावांचा पाठलाग करत होतो. गेल्या काही सामन्यांपासून आमचे गोलंदाजांचे युनिट आणि फलंदाजांची फळी सामन्यावर जबरदस्त पकड मिळवण्याऐवजी केवळ सामन्यात राहण्याचा प्रयत्न करत आहे’. याचा अर्थ असा की सामन्यात मुंबई इंडियन्सकडे आक्रमकता पाहायला मिळत नाहीये.
दुसरीकडे, आरसीबीने चार सामन्यांपैकी तीन विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.
IPL 2026 – मुंबईची चिंता वाढली, सलग पाचव्या लढतीत जसप्रीत बुमराहच्या विकेटची पाटी कोरी
संघाच्या योजना यशस्वी होत नसल्याचे मान्य करताना संघाला काही दिवसांचा वेळ मिळाला असून आता अनेक गोष्टींवर पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचेही तो म्हणाला. तसेच आम्ही आखलेल्या योजना काम करत नसल्याचेही त्याने मान्य केले. आता फलंदाजांची फळी किंवा टिचून गोलंदाजी करणारी युनिट म्हणून इतर कोणते पर्याय संघाकडे आहेत याकडे लक्षं देणे आवश्यक असल्याचेही त्याने म्हटले आहे.
पॉवरप्लेच्या षटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले. हार्दिक म्हणाला, ‘जर आम्ही चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली तर नाणेफेकीचा निर्णय काहीही असो, आम्हाला अडचण येणार नाही. पॉवरप्लेमध्ये लय कशी मिळवता येईल, यावर आमची चर्चा सुरू आहे. रदरफोर्डने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला संघात बदल करण्यासाठी एक अतिरिक्त पर्याय आणि आत्मविश्वास मिळाला आहे, असेही तो म्हणाला.
संघातल्या सहकाऱ्यांसोबत संवाद… हे कठीण आहे, पण यातून शिकुया!
“‘ ” – Captain HP’s message to the team! pic.twitter.com/UAJ36N0ceq
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2026
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने विजयाचे श्रेय फलंदाजांना दिले. तो म्हणाला, ‘विराट भाई आणि सॉल्टने ज्या प्रकारे सुरुवात करून दिली, त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर मी आणि टिम डेव्हिडने केलेल्या खेळीमुळे हा एक सांघिक विजय ठरला. लोकांना वाटते की मला फिरकी खेळायला आवडते, पण मला वेगवान गोलंदाजीचा सामना करायला अधिक आवडते आणि या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना आपल्याला चांगलीच मजा आल्याचे देखील तो म्हणाला.



























































