शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या संभाजीनगर  नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निर्वाचित झालेल्या 5 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधान भवनात झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक–निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर  विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी  (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगावकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.