रंगनाटय़ : असहाय्यतेतून भय मुक्ततेच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राज चिंचणकर

नाटक म्हणजे मनोरंजन, अशी सहजसोपी व्याख्या असण्याच्या पार्श्वभूमीवर काही नाटय़कलाकृती महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतात. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत एका वेगळय़ा वाटेवर मार्गक्रमण करणारे ‘अभया’ हे नाटक समाजाची आणि सामाजिक व्यवस्थेची स्पष्ट ओळख करून देते. बाललैंगिक शोषणासंबंधी जनजागृती करणारे हे नाटक वास्तववादी चित्रण करणारे आहे.

सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यप्रधान हे आणि असे विविध पदर असलेल्या अनेक नाटय़कृती व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर सादर होत असतात. यातली काही नाटके रसिकांना निव्वळ मनोरंजनाचा आस्वाद घेऊ देतात; तर काही नाटके त्यासोबतच विचारप्रवृत्त करायलाही भाग पाडतात. अशी अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आतापर्यंत आली आहेत आणि रसिकांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत एका वेगळय़ा वाटेवर मार्गक्रमण करणारे ‘अभया’ हे नाटक या मांदियाळीत अचूक बसते.

कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमाद्वारे तसेच विविध सामाजिक कार्यामुळे रंगकर्मी मीना नाईक यांची विशेष ओळख नाटय़सृष्टीला आहे, पण त्याचबरोबर बालनाटय़ांच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालणाऱया नाटय़कर्मी म्हणूनही त्यांचे नाव नाटय़सृष्टीत घेतले जाते. नाटक म्हणजे मनोरंजन, अशी सहजसोपी व्याख्या साधारणपणे केली जाते, पण या पार्श्वभूमीवर, वाटेत येणाऱया काचा तुडवत गेली अनेक वर्षे मीना नाईक त्यांना जो महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे; तो रंगभूमीच्या माध्यमातून त्या सातत्याने देत आहेत.

लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडित अशी काही नाटके मीना नाईक यांनी आतापर्यंत मंचित केली आहेत. दोन दशकांपूर्वी त्यांनी बाललैंगिक शोषण हा विषय हाताळत ‘वाटेवरती काचा गं’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. या नाटय़कृतीने समाजाच्या डोळय़ांत अंजन घालण्याचे काम तर केलेच, परंतु त्याचबरोबर या नाटकाने सामाजिक स्तरावर एका विचाराला वाट मोकळी करून दिली, पण या नाटकानंतरही त्यांनी अशा विषयांसाठी हात आखडता घेतला नाही. याचे कारण भोवतालची सामाजिक स्थिती हेच म्हणावे लागेल. त्यासाठी त्यांनी ‘अभया’ हे नाटक मंचित करून समाजप्रबोधन करण्याचा वसा पुढे सुरू ठेवला आहे.

आता एका विशिष्ट पद्धतीची शैली असणारी नाटके रंगमंचावर आणण्यासाठी त्या का प्रवृत्त झाल्या असाव्यात, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अर्थात याचा सरळसरळ अर्थ असा की, कितीही ठणाणा केला तरी समाजात आमुलाग्र बदल होण्यास अजून अवकाश आहे. त्यासाठी अशा रंगकर्मींना पुनः पुन्हा असे विषय घेऊन समाजासमोर उभे राहणे क्रमप्राप्त ठरत असावे. वाटेवर पसरलेल्या काचांचे काही तुकडे समाजपुरुषाच्या पायांना आतापर्यंत खोलवर टोचले असते तर कदाचित या रंगकर्मींना ‘अभया’सारखे नाटक सादर करण्याची वेळच आली नसती.

‘अभया’ या नाटकाची मूळ संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अशी जबाबदारी मीना नाईक यांनी स्वतःच्या खांद्यांवर घेतली आहे. साहजिकच, त्यांना या नाटय़कृतीतून जे काही म्हणायचे आहे, ते ठोसपणे मांडण्यात त्यांना कसलीच आडकाठी आलेली नाही. ‘अभया’ या नाटकातून मीना नाईक यांनी बाललैंगिक शोषणाचा विषय तर प्रकर्षाने उचलून धरला आहेच, परंतु त्याचबरोबर अशाप्रकारचा अन्याय झालेल्या एखाद्या पीडित मुलीचे भविष्य काय असू शकते, यावर अधिक लक्ष पेंद्रित करत ते त्यांनी आविष्कृत केले आहे.

बाललैंगिक शोषणाचा मुद्दा मांडताना या नाटकात वायफळ पसारा टाळला आहे. केवळ एका स्त्र्ााr पात्राभोवती हे नाटक फिरते. एका अनोळखी व्यक्तीच्या शोषणाला एक शाळकरी मुलगी बळी पडते आणि ही पीडित मुलगी तिला शक्य असलेल्या मार्गांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, मात्र हे सर्व करत असताना तिला समाजाची आणि सामाजिक व्यवस्थेची स्पष्ट ओळख होत जाते. यातून तिची होणारी घुसमट आणि तिचा वाढत जाणारा मानसिक ताण याचे प्रखर चित्रण या नाटकात येते. एखाद्या पीडितेला न्याय मिळवण्यासाठी निरनिराळय़ा पातळीवर कसे झगडावे लागते, याचे वास्तव रूप मीना नाईक यांनी या नाटकातून दृगोच्चर केले आहे. केवळ हा विषय मांडूनच त्या थांबलेल्या नाहीत; तर बाललैंगिक शोषणासंबंधीच्या कायद्याविषयी जनजागृती करण्याचाही त्यांनी यातून प्रयत्न केला आहे.

‘अभया’ या नाटय़ासाठी रंगमंचावर उभारलेले मोजके, परंतु सूचक नेपथ्य व प्रॉपर्टी यातून हा विषय अधिक टोकदार बनून समोर येतो. अशा पद्धतीचे नाटक केवळ रंगभूमीवरच सादर करायला हवे असे नाही, तर हा विषय समाजाच्या अंतरंगात पोहोचवण्यासाठी हे नाटय़ अगदी कुठेही सादर करता येऊ शकेल याची घडीही त्यांनी सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून बसवली आहे. नाटकाच्या विषयाच्या अनुषंगाने किंवा प्रयोग आटोपशीर करण्याच्या उद्देशाने, त्यांनी नाटकाचा भार एकाच पात्रावर टाकला आहे. मात्र यात अजून एखाद्या पात्राचे प्रयोजन करून या नाटकाला अधिक उठावदारपणा बहाल करता येणे शक्य होते, पण या सगळय़ातून हे नाटक सादर करण्याचा त्यांचा उदात्त हेतू मात्र सतत लक्षात येत राहतो.

आतापर्यंत काही युवा अभिनेत्रींनी या नाटकात सहभाग नोंदवला असला तरी सध्या या नाटकातली भूमिका चिन्मयी स्वामी पार पाडत आहे. इतक्या टोकदार विषयावरचे नाटक एकटीच्या खांद्यांवर पेलून न्यायचे ही मोठीच जबाबदारी म्हणायला हवी; मात्र चिन्मयीने ती सक्षमतेने पेलल्याचे दिसून येते. राग, चीड, घुसमट, त्वेष, असहाय्यता आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकवटलेले बळ अशी या नाटकातली सगळी अग्निदिव्ये ती पार करत गेली आहे. ‘कळसूत्री’ या संस्थेने या नाटकाच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मंचित केला आहे. अर्थात, या नाटय़ातून समाजाने योग्य तो बोध घेणे आवश्यक आहे, अन्यथा अशा अनेक ‘अभयां’च्या वाटेवर पसरलेल्या काचा अधिक टोकदार होत राहतील आणि रंगकर्मींना पुनः पुन्हा असे विषय आविष्कृत करत समाजप्रबोधन करण्याची वेळ येत राहील.

– [email protected]