रंगकर्मींच्या मदतीला धावला थिएटर दोस्त

कोरोनाच्या संकटामुळे सध्या नाटय़गृहे बंद आहेत. त्यावर नाटय़ व्यवसायावर अवलंबून असणाऱया अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच कोरोना संसर्ग झालेल्या मुंबई आणि परिसरातल्या रंगकर्मींना आधार देण्यासाठी थिएटर दोस्त पुढे सरसावला आहे. या थिएटर दोस्ताने गरजवंत रंगकर्मींना औषधे, जेवणाचे डबे, न्सिलिंग अशा सुविधा पुरविण्याचे काम सुरू केले आहे.

सुनील शानभाग, सपन सरन, अक्षय शिंपी, मंजिरी पुपाला, प्रियांका सरन, कल्याणी मुळे आणि सौम्या त्रिपाठी असे काही रंगधर्मी एकत्र येऊन त्यांनी ‘थिएटर दोस्त’ ही संकल्पना राबवली आहे. एकत्र राहू तर सशक्त राहू अशी थिएटर दोस्तची टॅगलाईन आहे. मागील आठवडय़ापासून या ग्रुपने काम सुरू केले. सोशल मीडियावर यासंदर्भातील मोबाईल नंबर शेअर करण्यात आले असून या उपक्रमाला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ‘थिएटर दोस्त’ उपक्रमा अंतर्गत टेली-डॉक्टर, वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांची फी, औषधे, घरगुती वाणसामान, जेवणाचे डबे यांसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. थिएटर दोस्तसाठी लागणारा निधीही रंगकर्मींनी उभा केला आहे. मुंबई आणि परिसरातल्या अनेक नाटय़कर्मींनी थिएटर दोस्तसाठी निधी दिला आहे. त्यातून हे काम होत आहे.

आमचा लहान ग्रुप आहे. सध्या आम्ही माहिती जमवण्याचे काम करत आहोत. मुंबई आणि परिसरातल्या डॉक्टरांच्या, वॉर्ड ऑफिसरच्या याद्या, ज्यांना गरज आहे असे रंगकर्मी आणि त्यांच्यापर्यंत औषधे-डबे पोहोचवू शकतील, अशा स्वयंसेवकांची माहिती जमवत आहोत. केवळ मराठी रंगभूमीच नव्हे तर हिंदी, गुजराती अशा विविध भाषांतील मुंबईतील रंगकर्मी, रंगमंच कामगार यांच्यासाठी ‘थिएटर दोस्त’ काम करत आहे, अशी माहिती अभिनेत्री कल्याणी मुळे यांनी दिली.

एखाद्या रंगकर्मीला कोरोना झाला तर त्याला लागणारी औषधे पुरवणे, औषधांसाठी निधी नसेल तर तो देणे, जेवणाचा डबा त्या भागात जिथे मिळत असेल तिथून उपलब्ध करून देणे, औषधांची, डॉक्टरांची, न्सिलर्सची यादी करणे, कोविड रुग्णाला टेली डॉक्टर्स देणे यावर या मंडळींचा भर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या