
पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दोन एटीएम सेंटरमध्ये मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी दिनेश धोंडीराम शिर्के (वय 28, रा. दिघी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मुख्य बाजारपेठेत दुर्गामाता मंदिराजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये दरवाजाने प्रवेश केला. एटीएमचा डिस्प्ले, की पॅड आणि शटर बॉक्स तोडला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. चोरट्यांनी एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनरा बँक पिंपरी शाखा येथील एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. या दोन्ही एटीएममध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.



























































