
देशात ज्ञानवापी मशीदीबाबतचा वाद सुरू असतानाच ताजमहलबाबतही वाद सुरू झाला होता. या जागेवर दावा सांगण्यासोबतच तेथे काही बंद खोल्या असून त्यात देवदेवतांच्या मुर्ती बंद असल्याचेही सांगण्यात येत होते. पुरातत्व खात्याने हे सर्व दावे फेटाळून लावले असून ताजमहल कोणत्याही मंदिराच्या जागी बांधला गेलेला नाही, असे सप्ष्ट केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकाराखाली ताजमहलची माहिती विचारली होती. त्याला पुरातत्व खात्याने दिलेल्या उत्तरात ताजमहल कोणत्याही मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ताजमहलमध्ये कोणत्याही बंद खोल्या किंवा बंद कक्ष नाहीत. ताजमहलमध्ये देवदेवतांच्या मुर्ती असलेले कुलुपबंद कक्ष नसल्याचेही पुरातत्व खात्याने स्पष्ट केले आहे.
जनतेने या माहितीची नोंद घ्यावी. तसेच काही गटाकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोणतेही मंदिर पाडून किंवा मंदिराच्या जागेवर ताजमहल बांधला गेलेला नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून विनाकारण वातावरण तापवण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.





























































