फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर मिळेल! शरद पवार यांचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणी जर पक्ष फोडण्याचे काम करत असेल तर त्यांनी ते करावे, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपला थेट इशारा दिला.

राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. नव्या राजकीय समीकरणांच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या अनुषंगाने अजित पवार यांचे नाव घेत माध्यमांनी प्रश्न विचारला असता पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपच्या फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ. कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर दिले जाईल, असे पवार यांनी ठणकावले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचा तपशील पवार यांनी आज सांगितला. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळय़ा असतील तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा केली आहे. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे पाठवणार आहेत. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल. यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, असे शरद पवारांनी सांगितले.

महाविकास आघाडी एकजूट आणि भक्कम आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे शरद पवार यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

 वंचितबाबत योग्य वेळी निर्णय

2024 च्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार का? वंचितही आघाडीबरोबर असेल का? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता, वंचितसोबत तशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. एकत्र लढण्याची इच्छा तर आहे, पण केवळ इच्छा पुरेशी नसते. अनेक गोष्टी आहेत. त्यामुळेच यावर योग्य वेळी निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.