
परळी येथील मोंढा मार्केटमध्ये संभाजीनगरहून आलेल्या एका व्यापाऱ्याची 24 लाख 97 हजार रूपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. लॉक केलेल्या कारमधून चोरट्यांनी बॅग लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने परळी शहरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील मोंढा मार्केटमध्ये संभाजीनगर येथील व्यापारी संजय गंगवाल गुरूवारी सकाळी पेपर कप विक्रीच्या वसुलीसाठी आले होते. त्यांनी त्यांची कार मोंढा मार्केट येथील हनुमान मंदिराच्या पाण्याच्या टाकीजवळ उभी करण्यास वाहन चालकाला सांगितले. त्यानंतर गंगवाल गाडीतून उतरून एका व्यापाऱ्याकडे गेले. तर वाहनचालक गाडी लॉक करून हॉटेलमध्ये गेला.
त्यावेळेत अज्ञात चोरट्यांनी कारचे लॉक उघडून गाडीतील पैशांची व वाहनचालकाच्या कपड्यांची बॅग पळविली. नाश्ता करुन परतलेल्या कारचालकाला गाडीचा दरवाजा उघडलेला दिसला. त्याने तातडीने गंगवाल यांना बॅग चोरीचा प्रकार सांगितला. त्या बॅगमध्ये वसूल केलेली 24 लाख 97 हजार रूपयांची रक्कम होती. या प्रकरणी संभाजीनगर येथील व्यापारी संजय गंगवाल यांच्या तक्रारीनुसार परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात करीत आहेत.
























































