
ब्रिजमोहन पाटील । पुणे
एकाच दिवशी पुण्यात सलग तिसरी गोळीबाराची गंभीर घटना घ़डली आहे. बुधवारी दुपारी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर क्राईम ब्राँचच्या पोलीस निरीक्षकांवर हा गोळीबार झाला आहे. गजानन पवार (गुन्हे शाखा, युनिट 2) असे या हल्ला झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. पवार यांच्या पोटात गोळी लागली आहे. जखमी पवार यांना तातडीने उचलून रुबी हॉस्फिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चंदननगरमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हत्येसंदर्भातील आरोपींना शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले असताना पवार त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. हत्येतील आरोपींनी गोळीबार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकावर गोळीबारानंतर रक्ताचा सडा पडला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात जीआरपीच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी एकाला पकडले आहे.
याआधी बुधवारी सकाळी चंदननगर येथे मेसचालक महिलेची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येवलेवाडी येथे ‘गणेश ज्वेलर्स’वर दरोड्याचा प्रयत्न झाला. चार दरोडेखोरांनी ज्वेलर्समध्ये लुटमार करण्याचा प्रयत्न केला आणि एका कामगारावर गोळी झाडली. हल्लेखोराने झाडलेली गोळी कामगाराच्या काखेच्या खाली लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अमृत परमार (30) असे या जखमी कामगाराचे नाव असून त्याच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्वेलर्स दुकानातील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

























































