
जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर राज्यात गुंतवणुकीचे मार्ग मोकळे झाले आहेत. अनेक खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखवली आहे. यामुळे अनेक कश्मीरी होतकरु तरुण आणि तरुणींना कामसाठी बाहेर जावे लागणार नाही.
लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की कलम 370 हटवल्यानंतर पाच महिन्यात जम्मू कश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी 44 प्रस्ताव आले आहेत. सर्व प्रस्ताव 13 हजार 120 कोटी रुपयांचे आहेत. सर्व प्रस्तावांचा वेगळ्या वेगळ्या विभागाकडून तपास सुरू आहे. अपास झाल्यानंतर या गुंतवणुकींना मान्यता दिली जाईल.
गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले की कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्ट ते 24 जानेवारी 2020 या 173 दिवसांत जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षादलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. तर 13 फेब्रुवारी 2019 ते 4 ऑगस्ट या काळात 82 जवान शहीद झाले होते. कलम 370 हटवल्यानंतर सुरक्षादलाचे जवान शहीद होण्याचे प्रमाण घटल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कलम 370 हटवल्यानंतर 32 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 10 जणांना जिवंत पकडण्यात आले होते.


























































