हजारो हिंदुस्थानी आखातात अडकले, नातेवाईकांच्या जिवाला घोर; नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची कसरत, स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोकडून उड्डाणांचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धानंतर आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केले असून काही देशांनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगभरातील विमानसेवांवर परिणाम झाला आहे. हिंदुस्थानातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 600 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेला जाणाऱ्या विमानसेवेवरही युद्धाचा परिणाम झाला आहे. यामुळे शेकडो प्रवासी मुंबई, दिल्लीसह देशातील विविध विमानतळांवर अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दुबई व आखाती देशांतील इतर शहरांमध्ये अडकलेले 2,100 पेक्षा जास्त हिंदुस्थानी नागरिक मुंबई, चेन्नईसह विविध शहरांमध्ये परतले. मायदेशात पाय ठेवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बिकट परिस्थितीतून परतलेल्या आप्तेष्टांना पाहून नातेवाईकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणवर 28 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतर देशातील विमान कंपन्यांनी 1,500 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.

आज मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख विमानतळांवरून 250 पेक्षा जास्त आंतरराट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबईतून 107, दिल्लीतून 80, बंगळुरू येथून 42 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणच्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रद्द झालेल्या उड्डाणांसाठी प्रवाशांना 7 मार्चपर्यंत परतावा देणार असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

अबुधाबीतून मुंबई, दिल्लीत विमान उतरले

आखाती देशांमध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना मायदेशी परतण्यासाठी मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. इंडिगो, स्पाईसजेट या स्वदेशी विमान कंपन्यांसोबत इमिरेट्स, ‘एतिहाद’सह काही परदेशी कंपन्यांच्या विमानातून काही प्रवासी हिंदुस्थानात परतले.

कल्याणमधील पर्यटक सुखरूप परतले

अबुधाबी येथे अडकलेले कल्याण पश्चिमेतील सहा पर्यटक अखेर सुखरूप हिंदुस्थानात परतले. कुटुंबातील सर्व सदस्य कल्याणमध्ये परतल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अडकलेले पर्यटक मुंबई विमानतळावर येताच कल्याणमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी एकच जल्लोष केला.

जगभरात विमानसेवा विस्कळीत

इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये विविध देशांचे दोन लाखांपेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी अनेक देशांच्या सरकारांची तारेवरची कसरत सुरू आहे. तीन दिवसांमध्ये आखाती देशांमधील सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या जेद्दाह व इतर काही शहरांमधून मर्यादित स्वरूपात काही उड्डाणे सुरू करण्यात आलेली आहेत. ब्रिटनचे एक लाख, इंडोनेशियाचे 58 हजार, जर्मनीचे 30 हजार तसेच विविध देशांचे हजारो नागरिक आखातात अडकले आहेत.

 आज 58 विमानांमधून हिंदुस्थानींना परत आणणार

आखाती देशांमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी देशातील विमान कंपन्या बुधवारी 4 मार्च रोजी एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट यांनी एकूण 58 उड्डाणांचे नियोजन केले आहे. इंडिगोने 30, एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसने 23 उड्डाणांचे नियोजन केले आहे. मस्कत, मदिना आणि ग्रीसमधील अॅथेन्स इत्यादी शहरांमधून ही विमाने उड्डाण घेतील. मंगळवारी हिंदुस्थानी पंपन्यांची 24 तसेच इमिरेट्स आणि एतिहाद या परदेशी पंपन्यांची 9 विमाने हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन आली.