सांगली, कोल्हापुरात हजारो लोक अडकलेलेच; आणखी तीन दिवस महापुराचा वेढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सांगली/कोल्हापूर

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापुरात पंचगंगेची आणि सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. मात्र हा महापूर पूर्ण ओसरण्यासाठी 72 तास लागतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज दिली. दरम्यान, तीन दिवसांनंतर महापुरातून कोल्हापूर आणि सांगलीची सुटका होणार असली तरी पुढील चार दिवस या भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा नवा इशारा हवामान खात्याने दिल्याने जलसंकट अधिकच गडद झाले आहे.

एनडीआरएफ, नौदल, लष्कराकडून बचावकार्य जोरात सुरू असले तरी हजारो लोक अजूनही महापुरात अडकल्याची भीती आहे. विशेषतः कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात शेकडो लोकांनी गाई-म्हशींसह जागा मिळेल तिथे आसरा घेतला आहे. काही भागात अन्न-पाण्यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचलेली नाही. पूर झपाटय़ाने ओसरण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवायला हवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पंचगंगा, कृष्णा, दुधगंगा आदी नद्यांमधून कर्नाटकातील अलमट्टी धरणात 5 लाख 15 हजार क्युसेक पाणी जमा (आवक) होत आहे. तर अलमट्टीतून 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र अलमट्टीतून r विसर्ग वाढविल्याशिवाय सांगली, कोल्हापुरातील महापूर लवकर ओसरणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत केवळ साडेतीन फुटांची घट झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी ओसरू लागले तरी ग्रामीण भागात पाण्याचा वेढा कायम आहे.
शिरोळ तालुक्यातील ज्या लोकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले त्या शाळेलाच पुराच्या पाण्याचा वेढा पडला. एनडीआरएफ, लष्कर, नौदलाचे पथक वेगाने बचाव कार्य करीत आहेत.
कोल्हापूर जिह्यात 249 गावांमधून 2 लाख 33 हजार लोकांना सुरक्षित स्थळी  हालविण्यात आले.
पुलाची शिरोळी येथे पुणे-बंगळुरू महामार्गावरील पाणी पातळी अवध्या 5 ते 6 इंचाने कमी झाली. महामार्गावर चार ते पाच फूट अद्याप पाणी आहे. त्यामुळे पाचव्या दिवशीही महामार्ग बंदच आहे.

पाणीपातळी कमी होऊ लागली

सांगली कृष्णेने 57.5 फुटांची पाणीपातळी गाठली होती. सांगली शहराचा निम्म्यापेक्षा अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. आजही एसटी स्टॅण्डमध्ये 12 फूट पाणी आहे. धरणक्षेत्रात कमी झालेला पाऊस आणि कोयना धरणासह इतर चार धरणांतून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे पाणीपातळी हळूहळू उतरू लागली आहे. 57.8 फूट असणारी पाणीपातळी आज सायंकाळपर्यंत 56 फुटांपर्यंत कमी झाली. पाणीपातळी कमी होत असताना कॉलेज कॉर्नर, माधवनगर रस्त्यावर पाणी ओसरले आहे. शहराच्या अनेक भागांतील पाणी ओसरू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ होते. मुख्यमंत्री हिराबाग कॉर्नर येथे पूरस्थितीची पाहणी करताना सांगलीवाडी येथील नागरिकांनी आमच्या सांगलीवाडीला भेट देऊन पाहणी करा, असा आग्रह धरला. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांची मदत केंद्रात जाऊन भेटी घेऊन विचारपूस केली.

हजारो लोकांना मदतीची प्रतीक्षा

सांगली – सोमवारपासून सांगली शहराला आणि कृष्णा-वारणाकाठाला महापुराने विळखा घातला आहे. सांगली शहरासह अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. पावणेदोन लाख लोक विस्थापित झाले आहेत. 117 कॅम्पमध्ये त्यांची व्यवस्था केली आहे. अनेकजण नातेवाईकांकडे, तसेच इतरत्र वास्तव्यास गेले आहेत. पूर हळूहळू ओसरत असला तरी हजारो लोकांपर्यंत अद्याप मदत मिळालेली नाही. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर अडकून पडलेल्या लोकांचे हाल होत आहेत. प्यायला पाणीही मिळत नाही. पिकांचे, तसेच उद्योग-व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. गेले पाच दिवस 4 ते 12 फूट पाणी साचले आहे. ‘एनडीआरएफ’च्या 95 बोटींतून रेस्क्यू मोहीम राबविली जात आहे.

मदतीचा मोठा ओघ

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी, नागरिकांकडून मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र मदत खऱया गरजूपर्यंत पोहचत नाही. त्याबाबत समन्वय हवा आहे. पुरग्रस्तांबरोबर पुरापासून अलिप्त असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.

सरकार इनऍक्शन

कोल्हापूर आणि सांगली मिळून 3,78,000 लोकांना बाहेर काढले. दोन जिल्हे मिळून 306 छावण्यांमध्ये निवारा.
2500 ते 5000 रुपये अशी मदत पूर्वी दिली जायची, आता 10 हजार ते 15 हजार रुपये मदत देण्यात येत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पूर्वी दीड लाखांची मदत दिली जायची, ती आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
अपंगत्व आल्यास पूर्वी 43 हजार रुपये मदत दिली जायची, ती आता 2 लाख रुपये करण्यात आली आहे.
घर पडले तर पूर्वी 60 हजार रुपये दिले जायचे, ते आता 1 लाख रुपये करण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून

मुंबई – कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीच्या कामावर देखरेख करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिह्यात तळ ठोकून आहेत. तेथे सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली असून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून 100 डॉक्टरांचे पथक 11 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागात दाखल होत आहे.

खान्देशातही पूर

सांगली, कोल्हापूरनंतर आता खान्देशातही महापूर येण्याची शक्यता आहे. धुळे व नंदुरबार जिल्हय़ांत पावसाने हाहाकार माजविला आहे. तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे. खान्देशातील 14 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या शिरोळ तालुक्याची अवस्था भयानक झाली आहे. कृष्णेचा महापूर आणि अलमट्टी धरणातील बॅक वॉटरमुळे पाच दिवसांपासून खिद्रापूर, राजापूर, कुरुंदवाड, गणेशवाडीसह 26 गावे पाण्यात आहेत. जनावरांसह अनेक लोकांनी घरांच्या तिसऱया मजल्यांवर, छतांवर आश्रय घेतला आहे. लोकांची आणि जनावरांचीही उपासमार सुरू आहे. प्यायला पाणीही मिळत नाही. एका खोलीत 20-25 लोक दाटीवाटीने राहत आहेत.